मुंबई : जगभरातील शेअर बाजारात घसरण सुरू आहे आणि याचा मोठा परिणाम जगातील टॉप-१० अब्जाधीशांवरही झाला आहे. अदानी ते अंबानी आणि इलॉन मस्क ते सर्जी ब्रिन यांच्या संपत्तीत एकूण ४२.६ अब्ज डॉलरचे नुकसान झाले.
अंबानी आणि अदानी यांच्या संपत्तीत ३.७ अब्ज डॉलरची घसरण झाली तर यूएस शेअर बाजारातील घसरणीमुळे मस्क, बेझोस, बिल गेट्स, वॉरन बफे यांसारख्या अब्जाधीशांचेही नुकसान झाले. सोमवारी सेन्सेक्स १४५६ अंकांनी घसरून ५२,८४६ च्या पातळीवर आणि निफ्टी ४२७ अंकांच्या घसरणीसह १५,७७४ च्या पातळीवर खाली आला तर अमेरिकन शेअर बाजारातही मोठी घसरण दिसून आली.
एलोन मस्कची कंपनी टेस्ला इंकचे शेअर्स सोमवारी ७.१० टक्क्यांनी घसरले. याचाच परिणाम म्हणजे इलॉन मस्कची संपत्ती एका दिवसात ११.८ अब्ज डॉलरने कमी झाली आणि आता त्यांची एकूण संपत्ती २०३.३ अब्ज डॉलरवर आली आहे.
ही आकडेवारी फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांची आहे. या यादीत बर्नार्ल्ड ऑर्नाल्ट आता दुस-या क्रमांकावर पोहोचला आहे, त्याला काल ५.८ अब्ज डॉलर धक्का बसला. आता त्याची एकूण संपत्ती फक्त १४०.२ अब्ज डॉलर इतकी आहे. तिस-या क्रमांकावर अॅमेझॉनचे माजी सीईओ जेफ बेझोस आहेत, ज्यांना ६ अब्ज डॉलरचा धक्का बसला होता. एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत असलेले जेफ बेझोस यांची संपत्ती आता १२९.४ अब्ज डॉलर आहे. जगातील पहिल्या दहा अब्जाधीशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या बिलगेट्सला २.३ अब्ज डॉलरचे नुकसान झाले. त्यांची एकूण संपत्ती सध्या १२१.२ अब्ज डॉलर आहे. वॉरन बफे यांना ३.८ अब्ज डॉलरचा झटका बसला.
याशिवाय मुकेश अंबानींना १.९ अब्ज डॉलरचा फटका बसला. आता मुकेश अंबानी यांची संपत्ती १०० अब्ज डॉलरवर आली. अदानी देखील सोमवारच्या शेअर मार्केटच्या फटक्यातून वाचू शकले नाही आणि त्यांची एकूण संपत्ती १.८ अब्ज डॉलरने कमी झाली. आता ते ९६.७ अब्ज डॉलरसह सातव्या स्थानावर आहेत.
लॅरी पेजने ३.८ अब्ज डॉलर गमावले असून ते आठव्या स्थानावर आहे तर लॅरी एलिसन ४.३९ अब्ज डॉलर गमावले असून नवव्या क्रमांकावर आहे तर १० व्या क्रमांकावर सर्जी ब्रिन असून त्यांना ३.५ अब्ज डॉलरचा धक्का बसला आहे.