36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeउद्योगजगतलॅपटॉप, टॅबलेट उत्पादनावर भर; पीएलआय योेजनेला केंद्राची मंजुरी

लॅपटॉप, टॅबलेट उत्पादनावर भर; पीएलआय योेजनेला केंद्राची मंजुरी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लॅपटॉप, टॅब, ऑल-ईन-वन पीसी आणि सर्व्हर निर्मितीला गती देण्याचा निर्णय आज घेतला. त्यासाठी आयटी हार्डवेअर सेक्टरमधील प्रोडक्शन लिंक्ड स्कीम (पीएलआय) ला मंजुरी देण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून जगभरातील कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यास आकर्षित केले जाईल, असे केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

या अगोदर मागच्या आठवड्यात केंद्र सरकारने दूरसंचार उपकरणे निर्मितीसाठी १२,१९५ कोटी रुपयांच्या पीएलआय योजनेला मंजुरी दिली होती. आता केंद्रीय मंत्रिमंडळाने आयटी हार्डवेअर सेक्टरसाठी ७ हजार ३५० कोटी रुपयांच्या पीएलआय योजनेला मंजुरी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय दूरसंचार तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली. या अगोदर मोबाईल फोन आणि त्याच्या पार्टस््शी संबंधित प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीमच्या माध्यमातून ३५ हजार कोटी रुपयांचे उत्पादन झाले आहे. यातून २२ हजार ५०० लोकांना नोकरीची संधी मिळाली आणि १३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. आता लॅपटॉप, टॅब, पीसी निर्मितीतूनही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे, असेही प्रसाद यांनी सांगितले.

केंद्रीय कॅबिनेटने फार्मास्युटिकल सेक्टरसाठीही पीएलआय स्कीमला मंजुरी दिली. ही योजना २०२०-२१ पासून २०२८-२९ पर्यंत राहील. या योजनेचे मुख्य लक्ष्य उच्च दर्जाचे उत्पादन तयार करणे आणि निर्यात वाढविण्यास प्रोत्साहन देणे असेल, असेही प्रसाद यांनी सांगितले.

भारत बनणार मॅन्युफॅक्चरिंग हब
या अगोदर भारतात मोबाईल उत्पादनाला गती देण्याचा प्रयत्न झाला. आता लॅपटॉप, टॅब, पीसी उत्पादन वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. या माध्यमातून भारत मॅन्युफॅक्चरिंग हब बनेल. यातून निर्यातीला गती मिळेल आणि रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील, असे केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या