31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeउद्योगजगतमेक इन इंडियानंतरही उत्पादन क्षेत्रात घरघर

मेक इन इंडियानंतरही उत्पादन क्षेत्रात घरघर

बिझनेस स्टॅण्डर्डस्चा अहवाल, मोदी सरकारचे अपयश, २० वर्षांतील सर्वांत वाईट कामगिरी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अशा स्थितीत या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी देशात निर्माण होणा-या वस्तूंच्या उत्पादनवाढीला गती देण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत आहे. त्यासाठी विविध योजनांची घोषणाही केली. मात्र, या सरकारला अद्याप यश मिळू शकले नाही. मेक इन इंडिया योजनेचा तर देशभर डांगोरा पिटला. मात्र, त्यानंतरही २०१९ मध्ये उत्पादन क्षेत्रात मोठी घसरण झाली. भारताच्या उत्पादन क्षेत्राने २०१९ मध्ये जीडीपीच्या २७.५ टक्के योगदान दिले. ही उत्पादन क्षेत्रातील मागील २० वर्षांतील सर्वांत वाईट कामगिरी ठरली आहे, असे बिझनेस स्टॅण्डर्डस्च्या वृत्तात म्हटले आहे.

केंद्रातील मोदी सरकारने देशातील उत्पादनवाढीला गती देऊन आर्थिक व्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने बरीच पावले उचलली. तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केल्याचा दावा केला. एवढेच नव्हे, तर भारतात निर्माण होणा-या वस्तूंचे उत्पादन वाढविण्यासाठी मागील वर्षी ‘मेक इन इंडिया’ योजना सुरू केली. मात्र, त्यानंतरही उत्पादन क्षेत्रात मोठी घसरण झाली आहे. २०१९ मध्ये भारताच्या उत्पादन क्षेत्राने जीडीपीच्या २७.५ टक्के योगदान दिल्याचे समोर आले आहे. मात्र, ही उत्पादन क्षेत्रातील सर्वात वाईट कामगिरी ठरली आहे.

यापूर्वीच्या उत्पादन क्षेत्राच्या सुमार कामगिरीवर नजर टाकल्यास २०१६ मध्ये २९.३ आणि २०१४ मध्ये सरासरी ३० टक्के योगदान दिले आहे, असेही बिझनेस स्टॅण्डर्डसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. मेक इन इंडिया मोहिमेनंतरही अशी परिस्थिती असल्याने औद्योगिक उत्पादनासंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये २३.९ टक्क्यांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वी २०१९-२० मध्ये अर्थव्यवस्थेत ४.२ टक्क्यांची घसरण दिसून आली होती. मात्र २०१८-२०१९ भारतीय अर्थव्यवस्थेत ६.१ टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यामुळेच मागील दीड वर्षांपासून भारतीय अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याचे चित्र दिसत आहे. यंदा आर्थिक विकास दरही १० टक्क्यांनी रोडावल्याचे चित्र आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत १०.३ टक्क्यांची घसरण पाहायला मिळेल. ४० वर्षांत पहिल्यांदाच भारतीय अर्थव्यवस्थेत २३.९ टक्क्यांची घसरण झाल्याने जीडीपीत अभूतपूर्व घसरण पाहायला मिळाली. भारतीय अर्थव्यवस्थेची ही अभूतपूर्व घसरण लक्षात घेऊन मोदी सरकार विविध उपाययोजना करीत आहे. मात्र, भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्याऐवजी सातत्याने चिंता वाढविणारी स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे आर्थिक आघाडीवर मोदी सरकार तोंडघशी पडताना दिसत आहे.

बहीण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या