बंगळुरु : देशातील वाढत्या कोरोना संसर्गाने आरोग्यसह अन्यही क्षेत्रांवर प्रभाव टाकण्यास सुरुवात केली आहे. उत्पादन क्षेत्रातही मार्च महिन्यात मोठी घसरण झाली असून गेल्या ७ महिन्यातील निचांकी पातळी गाठली आहे. उत्पादन क्षेत्रातील घसरणीमुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आयएचएस मार्केट या खासगी संस्थेने देशातील पुनश्च वाढत्या कोरोना संसर्गानंतर उत्पादन क्षेत्रावरील परिणाम तपासण्यासाठी सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणातून चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या महिन्यापासूनच कोरोना संसर्ग वाढत असून अनेक राज्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊनची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी उत्पादकांनी मागणीत होणा-या संभाव्य घटीची धास्ती मार्च महिन्याच्या दुस-या पंधरवड्यापासूनच घेतली आहे. मागणीत घट होईल म्हणून विनाकारण गुंतवणूक करुन भरपूर उत्पादन करण्यापेक्षा कमीच उत्पादन करण्याची भावना वाढीस लागली आहे. आयएचएसच्या सर्वेक्षणानूसार उत्पादनीय खरेदी व्यवस्थापन निर्देशांक (पीएमआय) मार्च महिन्यात ५५.४ इतका होता.
मात्र जानेवारीत तो ५७.५ इतका होता. मात्र तरीही पीएमआय ५० अंकांच्या वर असणे ही बाब उत्पादन क्षेत्रातील सुदृढ पायाचे निदर्शक असल्याचे स्पष्ट करीत आहे. मात्र एप्रिल महिन्यात काय चित्र असेल, ही मोठी चिंतेची बाब आहे. आयएचएस मार्केटमध्ये सहयोगी संचालिका असलेल्या पॉलियाना डि लीमा असेही सांगितले आहे की कोरोनासंसर्गाच्या वाढत्या कहराबरोबरच मागणी संकुचित होण्याची भीतीही अनेक उत्पादकांनी व्यक्त केली आहे, असे आयएचएस मार्केटमधील सहयोगी संचालिका पॉलियाना डि लीमा यांनी नमूद केले आहे.
मागणीत मंद गतीने वाढ
मार्च महिन्यात उत्पादनक्षेत्रातील कच्चा माल व पक्का मालाच्या किंमतीत फार मंद गतीने वाढ होत आहे. त्यावरुन फेबु्रवारी महिन्यातील महागाईचा दर किंचित कमी झाल्याचे दिसून येत आहे. महागाईचा दर कमी होण्यामागे मागणीत झालेली घट हे प्रमुख कारण असण्याची शक्यताही लीमा यांनी व्यक्त केली आहे. त्याचा फटका रोजगारावरही बसला आहे.
कर्मचारी कपातीतही मार्चमध्ये वाढ
कोरोनाची पहिली लाट आल्यापासूनच कंपन्यांनी व उत्पादकांनी कर्मचारी कपातीला सुरुवात केली होती. गेल्या सहा महिन्यात ती स्थिती किंचित प्रमाणात सुधारण्याच्या मार्गावर असतानाच पुन्हा कोरोनाचे संकट वाढू लागल्याने मार्च महिन्यात पुन्हा काही कंपन्यांनी कर्मचार कपातीला सुरुवात केली आहे. मार्च महिन्यात गेल्या ६ महिन्याच्या तुलनेत सरासरी अधिक कर्मचारी कपात झाली आहे.
जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही – गृहमंत्री अमित शहांनी शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली