पुणे: पुण्यात सुरू असलेल्या एशिया इकॉनॉमिक डायलॉगमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. भारत २०३० पर्यंत जपानला जीडीपीच्या संदर्भात मागे टाकेल. यासोबतच भारत आशियातील दुसरी आणि जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आशिया इकॉनॉमिक डॉयलॉग २०२२ मधील एका चर्चेत भाग घेतला होता.
येणा-या काळात भारत आणि आशियाची काय परिस्थिती असणार आहे? असे विचारले असता आशियाने गेल्या दोन शतकांपासून खूपच वाईट काळ पाहिला आहे, आता आशियाची वेळ आली आहे, असे सांगितले. २१ वे शतक आशियाचे असेल. ग्लोबल इकॉनॉमीचे सेंटर आता आशियामध्ये शिफ्ट झाले आहे. आशियाची जीडीपीही इतर जगाच्या तुलनेत सर्वांत जास्त झाला आहे भारताचा जीडीपी २०३० पर्यंत जपानपेक्षाही मोठा होईल. यासोबतच भारत अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल. चीनची ग्रोथ स्टोरी जितकी शानदार आहे, तितकीच शानदार भारताची असेल, असेही त्यांनी सांगितले.
भारतासाठी तीन गोष्टींवरील काम महत्त्वाचे
भारताने तीन गोष्टींवर काम करण्याची गरज आहे. सर्वांत आधी भारताला १० टक्क्यांहून अधिक ग्रोथ रेटसाठी एनर्जी आऊटपूट वाढवायला हवे. दुसरे म्हणजे एनर्जी बास्केटमध्ये क्लीन अँड ग्रीन एनर्जीचे शेअर्स वाढवायला हवे. तिसरे म्हणजे आत्मनिर्भर बनायला हवे, असे त्यांनी सांगितले.