नवी दिल्ली : भारतातील स्टार्टअप कंपन्यांनी गेल्या वर्षभरात तब्बल १० हजारांपेक्षा कर्मचा-यांची कपात केली आहे. यामध्ये देशातील दिग्गज, नावाजलेल्या स्टार्टअप कंपन्यांचादेखील समावेश आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, म्हणून मोदी सरकारने स्टार्टअप ही महत्त्वाकांक्षी योजना आणली. मात्र, आता योजनेला घरघर लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एका अहवालातून ही बाब समोर आली आहे.
एकीकडे कोरोनामुळे अनेकांच्या नोक-या गेल्याने तरुणाईला बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. त्यातच रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण व्हाव्या, यासाठी मोदी सरकारने सुरू केलेल्या स्टार्टअप उद्योगालाही घरघर लागल्याचे चित्र आहे. कारण मागील काही दिवसांपासून स्टार्टअप उद्योगाला निधीची चिंता सतावू लागली आहे. आता कंपनीच्या आगामी वाटचालीसाठी नवीन रणनीती आखण्यावर विचार सुरू आहे. काही गुंतवणुकदारांकडून स्टार्टअप संस्थापकांसोबत चर्चा सुरू आहे. २०२२ मध्ये आर्थिक संकट निर्माण झाले आहे. यामध्ये कोरोना महासाथ आणि रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला आहे. जगभरातील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू आहे. बाजारात विक्रीचा दबाव वाढला असून गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक काढली जात आहे.
स्टार्टअप कंपन्यांना मोठ्या प्रमाणात निधीचा तुटवडा जाणवत आहे. स्टार्टअपमधील गुंतवणूक कमी होत आहे. पहिल्या तिमाहीत भारतीय स्टार्टअप कंपन्यांना ११.७ अब्ज डॉलरची गुंतवणूक मिळाली. या दरम्यान १३ युनिकॉर्न निर्माण झाले आहेत. एप्रिल महिन्यात ३.४ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात आली. यामध्ये कोणत्याही युनिकॉर्नची निर्मिती झाली नाही. तसेच मे महिन्यात फारच कमी गुंतवणूक झाली.
२७ स्टार्टअप्सनी केली कर्मचारी कपात
आतापर्यंत २७ भारतीय स्टार्टअप्सने १०,०२९ कर्मचा-यांना नोकरीवरून कमी केले आहे. यामध्ये कार्स २४, मीशो, ओला, एमपीएल, ट्रेल, वेदांतू आदी युनिकॉर्नचा समावेश आहे. मे महिन्यात ९ स्टार्टअपद्वारे नोकर कपातीची नोटीस देण्यात आली होती. मे महिन्यात ३३७९ कर्मचा-यांचा रोजगार हिरावला. जून महिन्यात आतापर्यंत १० स्टार्टअप्सने कर्मचारी कपात केली आहे.