26.9 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home उद्योगजगत कर्जाचा व्याजदर वाढणार

कर्जाचा व्याजदर वाढणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जानेवारीच्या पहिल्या आणि दुस-या आठवड्यात स्टेट बँकेसह अन्य बँकांनी मुदतठेवींवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली होती. याचा अर्थ स्वस्त कर्ज मिळणे अवघड होणार असून, आगाम काळात कर्जांवरील व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात कर्जे महाग होणार असल्याचे संकेत नुकतेच रिझर्व्ह बँकेने दिले. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी बँकांकडून दोन लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम अधिक व्याजदराने जमा करून घेतली.

रिझर्व्ह बँकेने ३.५५ टक्के व्याजाने ही रक्कम बँकांना भरायला लावली. व्याजाचा हा दर रिव्हर्स रेपोपेक्षा अधिक आहे. बँकांकडे ज्या वेळी अतिरिक्त रोख रक्कम शिल्लक असते, त्या वेळी ते रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. सध्या रिव्हर्स रेपोचा दर ३.३५ टक्के आहे. मात्र, शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने ३.५५ टक्के दराने अतिरिक्त रक्कम आपल्याकडे घेतल्याने बँंिकग सिस्टीममधील वाढलेले रोखतेचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे मत आर्थिक विश्लेषकांनी व्यक्त केले. रोखतेचे प्रमाण कमी होताच बँकांकडील निधीची आवश्यकता वाढत जाते आणि त्यांना अधिक व्याजदराने रिझर्व्ह बँकेकडून तो मिळतो. त्यामुळे बँकांकडून देण्यात येणा-या कर्जांवरील व्याजातही वाढ होते. मात्र, गृहकर्जांवरील व्याजदर वाढण्यास थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे.

५.६ लाख कोटींचा अतिरिक्त निधी
एका अभ्यासानुसार बँंिकग व्यवस्थेत जवळपास ५.६ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी पडून आहे. देशातील आर्थिक व्यवहार अद्याप कोरोनापूर्वीच्या स्तरावर आलेले नाहीत. त्यामुळे बँका अजूनही मोठ्या प्रमाणावर कर्जांचे वितरण करीत नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या मते बँकांच्या कर्जांचा वेग ५ ते ६ टक्क्यांनी वाढत आहे. त्याचे कारण त्यांच्याकडे अतिरिक्त रोख रक्कम जमा आहे. शुक्रवारी बँका आणि वित्तीय संस्थांनी रिझर्व्ह बँकेकडे तीन लाख कोटी रुपये जमा करण्याची तयारी केली होती. मात्र, रिझर्व्ह बँकेने दोन लाख कोटी रुपयांनाच मंजुरी दिली. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी घेतलेल्या निर्णयामुळे आगामी काळात कर्जांवरील व्याजात वाढ होण्याची शक्यता आहे.

मुदतठेवींचे व्याज वाढणार?
स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, अ‍ॅक्सिस बँक समवेत अन्य बँकांनी जानेवारीमध्ये मुदतठेवींवरील व्याजदरात वाढ केली. असे असले तरी व्याजदरांत केवळ ०.१ टक्काच वाढ झाली आहे. बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ समीर नारंग यांच्या मते एक वर्ष मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ झाली आहे. आगामी काळात अन्य मुदतींच्या ठेवींवरील व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते रिझर्व्ह बँक कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर) पुन्हा ४ टक्क्यांवर आणण्याची शक्यता आहे. वर्षभरापूर्वी हा दर ३ टक्क्यांवर आणण्यात आला होता. सीआरआर एका टक्क्याने वाढल्यास बँकिंग व्यवस्थेत दीड लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रोख रक्कम वाढते.

मोदींनी निवडणुकीसाठी बालाकोटचा वापर केला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या