मुंबई: वृत्तसंस्था
रिलायन्स (एडीएजी) समुहाचे प्रमुख अनिल अंबानी यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. लंडनमधील एका न्यायालयाने त्यांना चीनच्या तीन बँकांची ७१७ दशलक्ष डॉलर्सची रक्कम फेडण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना २१ दिवसांमध्ये ही रक्कम फेडावी लागणार आहे. या प्रकरणात अनिल अंबानी यांची वैयक्तिक हमी आहे. यामुळे त्यांना ही रक्कम भरावीच लागेल, असे हायकोर्ट आॅफ इंग्लंड अँड वेल्सच्या व्यावसायिक विभागाच्या न्यायमूर्ती नीगेल टियरे यांनी सांगितले.
ही रक्कम भरण्यास प्रतिवाद्यांना बंधनकारक आहे, असे न्यायमूर्ती नीगेल यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. यामुळे त्यांना ही संपूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. ही एकूण रक्कम ७१ कोटी ६९ लाख १७ हजार ६८१ डॉलर्स इतकी आहे.
Read More गृहमंत्र्यांचा कडक इशारा : अत्याचारांना उत्तेजन देणारे व्हिडिओ किंवा पोस्ट टाकाल तर खपवून घेणार नाही
आरकॉमशी निगडीत प्रकरण
हे प्रकरण रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडद्वारे २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या व्यावसायिक कर्जाची निगडीत असल्याची माहिती अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्यांनी दिली. तसेच, यासाठी त्यांनी वैयक्तीक हमी दिली होती, असेही ते म्हणाले. परंतु अनिल अंबानी यांनी हे कर्ज वैयक्तिकरित्या घेतले नव्हते, असे ही निवेदनात म्हटले आहे. इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक आॅफ चायनाने आपला दावा त्या आधारावर केला आहे़ ज्या हमीपत्रावर अनिल अंबानी यांनी कधी स्वाक्षरीचे केली नव्हती, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान हे त्यांचे वैयक्तिक कर्ज नाही. तसेच अनिल अंबानी हे सध्या अन्य कायदेशीर बाबींची चर्चा करत आहेत. त्यानंतरच ते पुढील कार्यवाही करतील, असे त्यांच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले. हे प्रकरण इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक आॅफ चायना लि. मुंबई शाखा, चायना डेव्हलपेंट बँक आणि एक्झिम बँकेशी निगडीत आहे. फेब्रुवारी महिन्यात या बँकांच्या बाजूने एक सशर्त आदेश जारी करण्यात आला होता.
न्यायमूर्ती डेव्हिड वॉक्समन यांनी ७ फेब्रुवारी रोजी या प्रकरणी सुनावणीदरम्यान २०२१ मध्ये पूर्ण होणाºया सुनावणीपूर्वी सहा आठवड्यांमध्ये १० कोटी डॉलर्स भरण्याचे आदेश अंबनींना दिले होते. आता या रकमेत ७ लाख ५० हजार पौंडांची अधिक रक्कम जोडण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आता अनिल अंबानी यांना ७१७ दशलक्ष डॉलर्सची रक्कम फेडावी लागणार आहे.