22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeउद्योगजगतअमेरिकेत मंदीचे वारे...

अमेरिकेत मंदीचे वारे…

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : अमेरिकेतील फेडरल बँकेकडून व्याजदरातील वाढ ही चलनवाढ नियंत्रणाच्या उद्देशाने केली जाते. २८ वर्षांतील ही सर्वांत मोठी व्याजदरवाढ ठरली, कारण अमेरिकी चलनवाढही ८.६ टक्के अशी ४० वर्षांतल्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. वीज, गॅसोलिन, डेअरी, भाजीपाला, मांस यांच्या अनियंत्रित दरवाढीमुळे ही परिस्थिती ओढवली. हे प्रमाण २ टक्क्यांच्या खाली आणण्याचे फेडरल रिझर्व्हचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे जूनअखेरीस आणखी जवळपास पाऊण टक्का व्याजदरवाढ करण्याचे संकेत फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी दिले आहेत.

कोविड-१९ महासाथीने लादलेल्या टाळेबंदी, संचारबंदीतून सावरण्यास इतर प्रमुख अर्थव्यवस्थांप्रमाणे अमेरिकेसही विलंब लागला. या संकटातून सावरून पूर्वपदावर येत असताना युक्रेन-रशिया युद्ध आणि त्यापाठोपाठ चीनमधील प्रमुख शहरांतील लॉकडाऊन अजून पूर्वपदावर आलेच नाही. धान्य, ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स आणि यांत्रिकी, परदेशी विद्यार्थी आणि स्थलांतरित कुशल कामगार या घटकांवर अमेरिकी अर्थव्यवस्था अवलंबून आहे. रोजगाराची उपलब्धता आणि बेरोजगारीचा दर या दोेन्ही आघाड्यांवर समाधानकारक स्थिती असली, तरी क्रयशक्ती म्हणावी तशी वाढलेली नाही. शिवाय कोविड मंदीवर उतारा म्हणून अमेरिकेच्या सरकारने लाखो डॉलर व्यवस्थेत ओतले, त्यामुळेही चलनवाढ भडकली.

आजवर घरे, वाहन-उद्योगांसाठीचे कर्ज सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध होत असे, ती परिस्थिती आता असणार नाही. व्याजदर वाढू लागल्यामुळे कर्जे महाग होतील. त्यामुळे ती घेण्याचा कल कमी होईल. उद्योगक्षेत्राकडून व्यवसायवृद्धीसाठी कर्ज घेणे कमी झाले, की त्याच्या पुढील टप्पा कामगार भरती गोठवणूक आणि नंतर कामगार कपातीचा ठरतो. येत्या काही महिन्यांत चलनवाढ निर्मूलन हेच फेडरल रिझर्व्हचे उद्दिष्ट असेल त्यामुळे व्याजदर चढेच राहतील. अध्यक्ष जो बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षासाठी मात्र हा काळ राजकीय कसोटीचा ठरणार आहे. कारण याच काळात मध्यावधी निवडणुका होऊ जात आहेत.

त्यातून अमेरिकी काँग्रेसमधील पक्षीय बलाबल नव्याने आखले जाईल. म्हणून बेरोजगारी आणि महाग कर्जे या निवडणुकांमध्ये कळीचा मुद्दा ठरू शकतात. ताज्या व्याजदरवाढीमुळे अमेरिकेतील रोखे व इतर गुंतवणुकीवरील परतावा वाढणार असल्यामुळे भारतीय रोखे आणि भांडवल बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांकडून अधिक प्रमाणात निर्गुंतवणूक आणि निर्गमन शक्य आहे. डॉलररूपातील निर्गुंतवणूक वाढू लागल्यामुळे त्या चलनाच्या तुलनेत रुपया आणखी कोसळू शकतो.

जानेवारीत जवळपास ७४.२५ रुपये असलेले प्रतिडॉलर मूल्य जूनच्या मध्यावर ७८.१७पर्यंत घसरले. परदेशी गुंतवणूकदारांनी २०२१मध्ये भारतात २५,७५२ कोटी रुपये नव्याने गुंतवले. त्या तुलनेत २०२२मध्ये पहिल्या पाच महिन्यांतच जवळपास १.९२ लाख कोटी रुपये गुुंतवणूकदारांनी काढून घेतले आहेत! ही निर्गुंतवणूक अजूनही कायम राहील. जगभरच्या मध्यवर्ती बँकांनी महागाई कमी करण्यासाठी व्यादरवाढीचा मार्ग अनुसरल्यामुळे चलन तरलतेशी निगडित संपन्नता काही काळ आक्रसली जाईल हे नक्की.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या