सेन्सेक्स ९०० अंकांनी वधारला

- शेअर गुंतवणूकदारांची तुफान कमाई

382

मुंबई : वृत्तसंस्था
कोरोना व्हायरसच्या संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थांना सावरण्यासाठी चीन आणि जपानमधील केंद्रीय बँकांनी केलेल्या उपायोजनांनी आज आशियातील भांडवली बाजारात तेजीची लाट धडकली. मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्सने ९९६ अंकांची झेप घेतली. या तेजीत गुंतवणूकदारांची मालमत्ता दोन लाख कोटींनी वाढली.

आजच्या सत्रात बँका, वित्त संस्था, आॅटो, रियल्टी, हेल्थकेअर या कंपन्यांच्या शेअर्सला मागणी दिसून आली. चीनची मध्यवर्ती बँक असलेल्या दि पीपल्स बँक आॅफ चायनाने चिनी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी १२० अब्ज युआनची मदतीची घोषणा केली आहे. जपानकडूनही मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पॅकेज जाहीर केले जाणार आहे. या घडामोडी भांडवली बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्या, असे चॉईस ब्रोकिंगचे सुमित बगाडिया यांनी सांगितले.

बगाडिया म्हणाले की आज निफ्टी ३.२ टक्क्यांनी वधारला. ज्यात बँंिकग इंडेक्समध्ये ७.३ टक्क्यांची वाढ झाली. अ‍ॅक्सिस बँक १४ टक्के, आयसीआयसीआय बँक १० टक्के आणि एचडीएफसी बँक ६ टक्क्यांनी वधारले. तर पॉवरग्रीड, मारुती, एशियन पेंट्स, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट सन फार्मा आदी शेअरमध्ये घसरण झाली. अखेर सेन्सेक्स ३१६०५ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २८६ अंकांच्या घसरणीसह ९३१४ अंकांवर स्थिरावला. युरोपातील बाजारांनी देखील सकारात्मक सुरवात केली आहे. युरोपीय बँकांकडून अर्थव्यवस्थेसाठी पॅकेज घोषीत करण्याची शक्यता आहे.

Read More  जगातील सर्वात खोल सोन्याच्या खाणीत कोरोना

कोरोना व्हायरसचा प्रकोप, प्रतिबंधात्मक लसीची चाचणी, अमेरिका-चीन संघर्ष, कच्च्या तेलाच्या किमती आदी घटकांचा आज बाजारावर प्रभाव होता. मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर ३० प्रमुख शेअरपैकी २४ शेअर तेजीसह बंद झाले. बाजारातील तेजीने रुपयाला बळ मिळाले. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया ७६.६० वर होता. आजच्या तेजीत कंपन्यांचे बाजार भांडवल दोन लाख कोटींनी वाढल्याचा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टीत तेजी फारकाळ टिकली नाही. नफेखोरांनी नफावसुली केल्याने बाजारात घसरणीचा ट्रेंड सुरु झाला. सेन्सेक्समधील तेजीला ब्रेक लागला. मेटल आणि आयटी सेवा क्षेत्रातील शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. सेन्सेक्स मंचावरील ३० पैकी १२ शेअर घसरणीसह बंद झाले होते. अखेर सेन्सेक्स ६३.२९ अंकांच्या घसरणीसह ३०६०९.३० अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०.२० अंकांच्या घसरणीसह ९०२९.०५ अंकांवर स्थिरावला होता.