नवी दिल्ली : कोरोना काळात मुकेश अंबानींच्या रिलायन्स ग्रुपने फेसबुकसारख्या मोठमोठ्या कंपन्यांच्या साथीने एकामागोमाग एक अशा रिटेल क्षेत्रातील बड्या कंपन्या विकत घ्यायचा सपाटा सुरु केला होता. यावर जगप्रसिद्ध कंपनी अॅमेझॉनने रिलायन्स रिटेलच्या एका मोठ्या डीलमध्ये अडचण निर्माण केली आहे. आज यावर सर्वोच्च न्यायालयाने ही डील स्थगित केल्याचा निर्णय देऊन अंबानींची घोडदौड रोखली आहे.
मुकेश अंबानींना मोठा झटका बसला आहे. पाच महिन्यांपूर्वी अंबानींच्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने फ्यूचर ग्रुप रिटेल आणि होलसेल बिझनेस तसेच लॉजिस्टिक अँड वेअरहाऊसिंग बिझनेस खरेदी केला होता. या डीलवर जगातील सर्वात मोठे अब्जाधीश जेफ बेजोस यांच्या अॅमेझॉनने आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
रिलायन्स बिग बझार ताब्यात घेतल्यानंतर फ्युचर ग्रुप एंटरप्रायझेसमध्येही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स १२०० कोटी रुपये गुंतवणार आहे. तसेच ६.०९ टक्के हिस्साही खरेदी करणार आहे. याशिव्या ४०० कोटी रुपये इक्विटी वॉरंटच्या रुपात गुंतविणार आहे. यामुळे एकूण ७.०५ टक्के हिस्सा हा रिलायन्सकडे राहणार आहे. परंतू आता न्यायालयाने स्थगिती दिल्याने हा व्यवहार धोक्यात आला आहे.
ब्लूमबर्गनुसार न्यायालयाने अॅमेझॉनच्या याचिकेवर सहमती दाखविली आहे. तसेच कनिष्ठ न्यायालयाचा निकालही फिरवला आहे. पुढील आदेश देईपर्यंत कंपनी ट्रिब्युनलला या डीलची मंजुरी देण्यावर बंधने आणली आहेत. याचबरोबर किशोर बियानी यांच्या फ्यूचर रीटेलला नोटीस पाठवून अॅमेझॉनच्या याचिकेवर लेखी उत्तर देण्यास सांगितले आहे. आता पुढील सुनावणी ५ आठवड्यानंतर होणार आहे.
नेटमेडची खरेदी
रिलायन्स इंडस्ट्रीची सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने ऑनलाईन फार्मसी नेटमेड्समध्ये ६० टक्के हिस्सेदारी विकत घेतली आहे. रिलायन्सने ही डील ६२० कोटींमध्ये केली असून मंगळवारी याची घोषणा केली. ही हिस्सेदारी व्हिटेलिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडमध्ये खरेदी केली आहे. या कंपनीच्या सहाय्यक कंपन्यांना नेटमेड्स नावाने ओळखले जाते. रिलायन्सने अन्य कंपन्या त्रिसारा हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, नेटमेड्स मार्केटप्लेस लिमिटेड आणि दाधा फार्मा डिस्ट्रिब्यूशन प्राइवेट लिमिटेडमध्ये १०० टक्के मालकी खरेदी केली आहे.
मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा