18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeउद्योगजगतसेन्सेक्सची भरारी

सेन्सेक्सची भरारी

एकमत ऑनलाईन

मुंबई : देशात दररोज होणारा कोरोना लसीकरणाचा रेकार्ड आणि जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी भांडवली बाजारात जोरदार तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल १००० अंकांनी वधारला आणि तो ६० हजार अंकाच्या समीप पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतदेखील २७० अंकाची वाढ झाली. आजच्या तेजीने गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत तब्बल तीन लाख कोटींची वाढ झाली.

आज बाजार सुरु होताच सेन्सेक्सने ४५० अंकाची झेप घेतली होती. त्यानंतर ही तेजी आणखी विस्तारली. सेन्सेक्स मंचावरील ३० पैकी २६ शेअर वधारले, तर भारती एअरेटेल, नेस्ले, आयटीसी आणि डॉ. रेड्डी लॅब या शेअरमध्ये घसरण झाली. फेडरल रिझर्व्हचे बॉण्ड खरेदीला विराम देण्याचे संकेत आणि एव्हरग्रँडेसाठी चीन सरकारने पुढे केलेला मदतीचा हात या दोन मुख्य कारणांनी आज जगभरातील भांडवली बाजारात तेजीची लाट धडकली असल्याचे शेअर बाजार विश्लेषकांनी सांगितले.

आयटी सेवा क्षेत्रात इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक, टीसीएस, टेक महिंद्रा, माइंड ट्री या शेअरमध्ये वाढ झाली. आज स्थावर मालमत्ता क्षेत्रात गोदरेज प्रॉपर्टीजच्या शेअरला अप्पर सर्किट लागले. गोदरेज प्रॉपर्टीजचा शेअर १७.७२ टक्क्यांच्या वाढीसह २२९६ रुपयांपर्यंत वाढला. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये २.२८ टक्के वाढ झाली आणि तो २४८६ रुपायांपर्यंत वाढला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ९५८ अंकाने वधारून ५९८८५ अंकावर बंद झाला. निफ्टी २७६ अंकांनी वधारून १७८२२ अंकावर स्थिरावला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या