37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeउद्योगजगतशेअर बाजार गडगडला

शेअर बाजार गडगडला

एकमत ऑनलाईन

मुंबई : भांडवली बाजारात बुधवारी सलग दुस-या दिवशी मोठी घसरण झाली आहे. आशियातील नकारात्मक संकेतांनी धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीचा सपाटा लावल्याने आज बुधवारी सेन्सेक्समध्ये ६०० अंकांची घसरण झाली. निफ्टीत १६० अंकांची घसरण झाली असून यामुळे गुंतवणूकदारांना जवळपास एक लाख कोटींचा फटका बसला आहे.

चीनमध्ये कोरोनाचा कहर वाढला आहे. कोरोनाचे आजवरचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने आशियात घबराट पसरली आहे. शांघाईमध्ये यापूर्वीच लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. तिथे मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहे. करोनाची चौथी लाट सुरु झाली असून याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुसरीकडे अमेरिकेतील महागाई नियंत्रणासाठी फेडरल रिझर्व्हने पतधोरण आणखी कठोर करण्याचे संकेत दिले आहेत. बँकेकडून पुन्हा एकदा व्याजदर वाढवले जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे गुंतवणूकदार धास्तावले. त्यांनी उदयोन्मुख बाजारातून पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला असल्याचे शेअर बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.

आजच्या सत्रात सेन्सेक्स मंचावरील ३० पैकी २४ शेअर घसरले आहेत तर ६ शेअर तेजीत आहेत. अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय, डॉ. रेड्डी लॅब, एशियन पेंट, पॉवरग्रीड, बजाज फायनान्स, रिलायन्स, एनटीपीसी, नेस्ले, इन्फोसिस, मारुती, आयटीसी, एचसीएल टेक, विप्रो, इंड्सइंड बँक, अ‍ॅक्सिस बँक, टेक मंिहद्रा या शेअरमध्ये घसरण झाली आहे. याशिवाय एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक या दोन्ही शेअरमध्ये सलग दुस-या सत्रात घसरण झाली. आज आयडीबीआय बँकेच्या शेअरमध्ये ९ टक्के वाढ झाली.

निफ्टीमध्ये निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी प्रायव्हेट बँक, निफ्टी रियल्टी या निर्देशांकात घसरण झाली आहे. सध्या मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये ६३५ अंकांची घसरण झाली असून तो ५९५४८ अंकावर आहे. निफ्टी १६७ अंकांच्या घसरणीसह १७७९२ अंकावर आहे.

मंगळवारी बाजारात घसरण झाली होती. दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स ४३५ अंकांनी घसरला आणि ६०,१७६ वर बंद झाला होता. मात्र बीएसई स्मॉलकॅप ४०० अंकांनी वाढून दिवसअखेर २९,५८२ वर थांबला. निफ्टी५० निर्देशांक ९६ अंकांनी घसरून १७,९५७ वर बंद झाला. बँक निफ्टी ५६७ अंकांनी खाली येत दिवसाच्या शेवटी ३८,०६७ वर स्थिरावला होता.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या