नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सुरू असलेल्याएआय समिटमध्ये एका रोबोटिक श्वानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. गलगोटिया युनिव्हर्सिटीने एका चिनी कंपनीच्या रोबोटला स्वत:चा शोध म्हणून सादर केल्याचा आरोप झाल्यानंतर, सरकारने युनिव्हर्सिटीला एक्सपो एरिया रिकामी करण्याचे आदेश दिले आहे. यावरून आता देशात राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत.
सोशल मीडियावर गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर नेहा सिंह यांचा एक व्हीडीओ व्हायरल झाला. यात त्या एका रोबोटिक डॉगला ओरियन असे संबोधून, तो युनिव्हर्सिटीच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसने तयार केल्याचा दावा करताना दिसल्या. मात्र, टेक तज्ज्ञांनी तातडीने हा दावा खोडून काढला. हा रोबोट प्रत्यक्षात चीनच्या यूनिट्री कंपनीचा जीओ २ मॉडेल असून तो बाजारात २ ते ३ लाख रुपयांना सहज उपलब्ध आहे.
सरकारची कारवाई आणि युनिव्हर्सिटीचा बचाव
या दिशाभूल करणा-या दाव्यामुळे गलगोटिया युनिव्हर्सिटीला समिटमधून बाहेर करण्यात आले आहे. मात्र, युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर डॉ. ऐश्वर्या यांनी हे वृत्त नाकारले आहे. आम्हाला अद्याप स्टॉल हटवण्याचे कोणतेही आदेश मिळालेले नाहीत. आम्ही कधीही असा दावा केला नव्हता की हे तंत्रज्ञान आम्ही बनवले आहे. आमची युनिव्हर्सिटी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ३५० कोटींची गुंतवणूक करत आहे आणि संशोधनासाठी आम्ही ही उपकरणे आणली आहेत. व्हीडीओचा चुकीचा अर्थ लावला गेला असे डॉ. ऐश्वर्या यांनी म्हटले. दुसरीकडे, प्रोफेसर नेहा सिंह यांनीही कबुली दिली. कदाचित बोलताना गोष्टी स्पष्टपणे मांडल्या गेल्या नाहीत. उत्साहाच्या भरात माझ्याकडून ते विधान झाले असावे, त्याची जबाबदारी मी घेत असे नेहा सिंह म्हणाल्या.
राजकीय वातावरण तापले
या प्रकरणावरून आता राजकारणही तापले आहे. काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. चीनच्या रोबोट्सना भारताचे उत्पादन म्हणून दाखवून मोदी सरकारने जागतिक स्तरावर देशाची थट्टा केली आहे. चिनी प्रसारमाध्यमेही आता भारतावर हसत आहेत अशी टीका काँग्रेसने केली. दुसरीकडे ही समिट केवळ एक पीआर तमाशा बनली आहे. भारताच्या टॅलेंटचा वापर करण्याऐवजी चीनच्या उत्पादनांचे प्रदर्शन केले जात आहे असे राहुल गांधींनी म्हटले.
एक्सकडून युनिव्हर्सिटीच्या दाव्याचे ‘फॅक्ट-चेक’
युनिव्हर्सिटीने आम्ही कधीही असा दावा केला नव्हता असे स्पष्टीकरण दिल्यानंतर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सने त्यावर कम्युनिटी नोट जोडली आहे. यात स्पष्ट म्हटले आहे की, युनिव्हर्सिटीचा हा नवा दावा दिशाभूल करणारा आहे, कारण सुरुवातीला त्यांनी तो रोबोट स्वत:चा शोध असल्याचेच सांगितले होते.

