Homeराष्ट्रीयभारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान

भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान

पंतप्रधान मोदी गप्प; काँग्रेसची टीका

नवी दिल्ली/मुंबई : अमेरिकेतील जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या मुद्यावरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबाबत केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटल्याचे म्हटले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक व्हीडीओ शेअर केला आहे. व्हीडीओमध्ये प्रसिद्ध रेडिओ होस्ट मायकल सॅव्हेजने, मुलांना जन्मसिद्ध नागरिकत्व मिळावे, यासाठी परदेशी नागरिक अमेरिकन कायद्यांचा फायदा घेण्यासाठी शेवटच्या महिन्यात अमेरिकेत येतात, असा दावा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानावरून आता काँग्रेसने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

स्थलांतरित लोक चीन, भारत किंवा या पृथ्वीवरील इतर कोणत्याही नरकसदृश ठिकाणांहून अमेरिकेत येतात; इथे मुले जन्माला घालतात, जी अमेरिकेचे नागरिक होतात, त्यानंतर ते चीन किंवा भारतातून आपल्या संपूर्ण कुटुंबाला येथे बोलावून घेतात. हे पाहण्यासाठी तुम्हाला फार दूर जाण्याची गरज नाही. आता येथे इंग्रजी भाषा बोलली जात नाही. आजच्या काळात येथे येणा-या स्थलांतरितांच्या वर्गामध्ये या देशाप्रती निष्ठा जवळजवळ उरलेलीच नाही आणि पूर्वी मात्र परिस्थिती अशी नव्हती, असे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी, जन्मसिद्ध नागरिकत्व या मुद्यावर सुरू असलेल्या एका व्यापक चर्चेचा संदर्भ दिला.

दरम्यान, जन्मसिद्ध नागरिकत्वाबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले की, जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या मुद्द्यावर आपल्या देशाच्या विरोधात निकाल दिला आणि तसे होण्याचीच शक्यता अधिक आहे, तर अमेरिकेला प्रचंड आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल; परंतु, त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, अमेरिकेला आपली प्रतिष्ठा गमवावी लागेल.

मोदी यांनी तीव्र आक्षेप नोंदवायला हवा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताला नरक म्हटले आहे, हे विधान अत्यंत अपमानजनक आणि भारतविरोधी आहे. यामुळे प्रत्येक भारतीयाला दु:ख झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी बोलून आपला तीव्र आक्षेप नोंदवला पाहिजे. मात्र, मोदींची आतापर्यंतची कामगिरी पाहता, ते ट्रम्प यांच्याशी बोलू शकतील याची शक्यता कमी आहे. ट्रम्प सातत्याने भारताबद्दल अपमानजनक वक्तव्ये करतात आणि मोदी गप्प बसून ऐकतात. नरेंद्र मोदी एक कमकुवत पंतप्रधान आहेत आणि त्याचे परिणाम संपूर्ण देश भोगत आहे असे काँग्रेस पक्षाने एक्सवर पोस्टवर म्हटले आहे.

५६ इंचाची छातीचे काय?
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत एक्सवर पोस्ट करून केंद्र सरकारवर टीका केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख ‘नरक’ असा करणे हा १४० कोटी भारतीयांचा अपमान आहे, पण दुर्दैव असे की, स्वत:ला विश्वगुरू म्हणवणारे पंतप्रधान मोदी या अपमानावर गप्प आहेत. आपल्या देशाचा स्वाभिमान विकून ही कोणती मैत्री ते जपत आहेत? ट्रम्प यांच्यासमोर पंतप्रधान मोदींची ५६ इंच छाती आणि तिची ताकद कुठे जाते? भारत देश एका कमकुवत नेतृत्वामुळे अपमान सहन करत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष सातत्याने भारताचा अपमान करतात आणि भारत शांतपणे ऐकून घेतो? साधा आक्षेप घेतला जात नाही, निषेध नोंदवला जात नाही..परदेशात जाऊन मिठ्या मारल्याने देश मोठा होत नाही, देशाचा सन्मान जपण्यासाठी ताठ कणा लागतो!, या शब्दांत वडेट्टीवार यांनी निशाणा साधला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR