अबु धाबी : आयपीएल २०२६ साठी मंगळवारी अबू धाबी येथे मिनी लिलाव झाला. १५६ खेळाडूंवर बोली लावण्यात आली. दहा संघांनी २१५.४५ कोटी रुपये खर्च करून ७७ खेळाडू घेतले, ज्यात २९ परदेशी आणि ४८ भारतीय खेळाडूंचा समावेश होता.
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. त्याला कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ने २५.२० कोटी रुपयांना विकत घेतले. ग्रीनने त्याचा सहकारी मिचेल स्टार्कचा विक्रम मोडला, ज्याला २०२४ मध्ये केकेआरने २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये, ऋषभ पंत २७ कोटी रुपयांसह पहिल्या क्रमांकावर आहे आणि श्रेयस अय्यर २६.७५ कोटी रुपयांसह दुस-या क्रमांकावर आहे.
ग्रीनला फक्त १८ कोटी रुपये मिळतील
कोलकाता नाईट रायडर्सने कॅमरुन ग्रीनला २५.२ कोटी रुपयांना खरेदी केले असले तरी, ग्रीनला फक्त १८ कोटी रुपये मिळतील. ७.२ कोटी रुपये बीसीसीआयच्या कल्याण निधीत जमा केले जातील. खरं तर, गेल्या वर्षी, बीसीसीआयने परदेशी खेळाडूंना जास्त मागणीचा गैरफायदा घेण्यापासून रोखण्यासाठी मिनी-लिलावात १८ कोटी रुपयांची कमाल मर्यादा निश्चित केली होती.

