मुंबई : भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मोठा सन्मान केल आहे. आता आयसीसीने त्याच्या नावाचा समावेश हा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये केला आहे. हा खास सन्मान मिळालेला धोनी हा भारताचा १० वा खेळाडू आहे. धोनीसह यावर्षी आयसीसीनं हाशिम आमला आणि मॅथ्यू हेडन यांचाही या खास यादीत समावेश केला आहे.
शांत स्वभावासह क्रिकेटच्या मैदानातील सर्वोत्तम रणनितीकार अशी धोनीची ओळख आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने भारतीय संघाला टी-२० वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी या तत्कालीन सर्व आयसीसी ट्रॉफी स्पर्धा जिंकून दिल्या आहेत. असा पराक्रम करणारा तो एकमेव कर्णधार आहे. ५३८ सामन्यात त्याने १७ हजार २६६ धावांसह विकेटमागे ८२९ फलंदाजांची शिकार करत क्रिकेट जगतात खास छाप सोडली आहे. आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया धोनीने दिली आहे.
बॅटिंगसह विकेटमागे कमालीचे मॅजिक
महेंद्रसिंह धोनीने २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. फलंदाजीसह विकेट किपिंगमधील खास कामगिरीसह त्याने क्रिकेट वर्तुळात आपला खास ठसा उमटवला. मोठ्या फटकेबाजीसह त्याने आपल्या फलंदाजीतील ताकद तर दाखवलीच. याशिवाय मिली सेकंदात स्टंपिंगसह अफलातून कॅचसह त्याने विकेटमागेही धोनी मॅजिक दाखवून दिले आहे.
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत रचला होता इतिहास
२००७ च्या पहिल्या वहिल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत धोनीच्या कॅप्टन्सीत भारतीय संघाने इतिहास रचला होता. त्यावेळी टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघ चॅम्पियन ठरेल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. पण कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला शह देत धोनीने नवा इतिहास रचला. ही भारतीय क्रिकेटची नवी सुरुवात होती. पुढे त्याने वनडे वर्ल्ड कपसह आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही संघाला यश मिळवून दिले.