नांदेड/ किनवट : प्रतिनिधी
काही दिवसांपासून परिसरात दहशत पवरविणा-या एका पट्टेदार वाघाचा मृतदेह किनवट तालुक्यातील मदनापूर शिवारात रेल्वे रुळावर एका आढळून आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी पहाटे धावणा-या पॅसेंजर रेल्वेच्या धडकेत या वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. मात्र, वाघाचा मृत्यू अपघातामुळे झाला की यामध्ये काही घातपात आहे, याची चौकशी केली जात आहे.
नांदेडमधील किनवट तालुक्यात एका पट्टेदार वाघाचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून या पट्टेदार वाघाची शनिवारपेठ, प्रधानसांगवी आणि मदनापूरसह दाभाडी, भूलजा परिसरामध्ये दहशत निर्माण केली होती. मात्र शनिवारी पहाटे मदनापूर शिवारातील रेल्वे रुळावर या वाघाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार, पॅसेंजर रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वाघाच्या मृत्यूची बातमी समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मात्र, या वाघाचा मृत्यू रेल्वेच्या धडकेमुळेच झाला की यामागे घातपाताची काही शक्यता आहे, याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वाघाच्या मृत्यूचे नेमकं कारण काय, याचा उलगडा तपासानंतरच होणार असून वनविभागाच्या तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
















