गडचिरोली : धानोरा तालुक्यातील (जि. गडचिरोली) सोडे येथील शासकीय आश्रमशाळेतील आणखी १७ विद्यर्थिनींना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना आज (दि.२१) सकाळी धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. सोडे (ता. धानोरा, जि. गडचिरोली) येथील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना बुधवार (दि. २०) दुपारी माध्यान्ह भोजनानंतर अस्वस्थ वाटू लागले.
१०७ विद्यार्थिनींची तपासणी करून औषधोपचार केल्यानंतर ९२ विद्यार्थिनींना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. यापैकी ४० विद्यार्थिनींच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर आज (दि. २१) सकाळी आणखी १७ विद्यार्थिनींना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.
सध्या या रुग्णालयात ६९ विद्यार्थिनी उपचार घेत असून, त्या उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गजबे यांनी सांगितले. दरम्यान, सोडे येथील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेत वैद्यकीय अधिका-यांचा चमू पाठविण्यात आला असून, उर्वरित विद्यार्थिनींची तपासणी करण्यात येत आहे.