शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील राणी अंकुलगा येथील युवक दत्तात्रय सूर्यकांत कुंभार वय २६ वर्षे रा राणी अंकुलगा ता. शिरूर अनंतपाळ जि. लातूर यांनी आपला संसार चालविण्यासाठी व व्यवसाय करण्यासाठी विविध फायनान्सचे लाखो रुपये कर्ज घेतले होते. त्या कर्जाचे हप्ते परतफेड होत नसल्यामुळे व मायक्रो फायनान्सच्या वसुलीच्या तगाद्यामुळे शेवटी सुुसाईड नोट लिहून दि. २६ ऑक्टोबर रोजी आपल्या राहत्या घरी दुपारी ३ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्या संदर्भात संबंधित फायनान्स बँकेच्या विरोधात बुधवार दि. २८ ऑक्टोबर रोजी शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यातसंबंधित फायनान्स व बँकेचे अधिका-याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात शिरूर अनंतपाळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की यातील नमुद फायनान्स कंपनी १ श्रीराम फायनान्स, २) एक्टास बँक, ३) रिंग ४ अॅप, ४) एचडीबी निलंगा यांचे सर्वांचे १७ लाख रुपयांचे कर्ज घर खर्च व व्यवसाय करण्यासाठी घेतले होते. पण मला ते परतफेड करणे शक्य होत नसल्यामुळे व सध्या दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे मला मायक्रो फायनान्सचे हप्ते फेडणे कठीण झाले असल्यामुळे शेवटी निराशा पोटी मी माझ्या राहत्या घरी आत्महत्या करत आहे.
यामुळे संबधीत बँकेचे अधिकारी कर्मचारी यांनी यातील मयतास वारंवार कर्ज वसुली करिता तगादा लावून त्यास मानसिक त्रास देऊन त्यास आत्महात्या करण्यास प्रवृत्त केले आहे. त्याच्या नातेवाईकांच्या जबाबावरुन मयताची पत्नी सविता दत्तात्रय कुंभार, रा. राणी अकुलगा ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर यांच्या फिर्यादीवरून शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात गुरनं ३३९/ २६ कलम १०८ बी.एन.सी.वरून गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोउपनि उमेश रायबोळे करीत आहेत.
















