परळी : महाराष्ट्रातील शेतक-यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढविण्यासाठी महायुतीच्या राज्यातील सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्र सरकार मदत करेल, अशी घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी येथील कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बुधवार दि. २१ ऑगस्ट रोजी केली. कापूस सोयाबीन, कांदा आणि उसाला योग्य भाव देण्यासाठी भारत सरकार कटीबद्ध राहील अशी ग्वाही देखील केंद्रीय कृषीमंत्री चौहान यांनी यावेळी दिली.
यावेळी महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांचे केंद्रीय मंत्री चौहान यांनी कौतुक केले. तसेच राहुल गांधी व शरद पवार यांनी फक्त बोलण्याचे काम केले, जनतेला काही दिले नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आवाज दिला आणि मी या कार्यक्रमाला आलो असा उल्लेख केंद्रीय कृषीमंत्र्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून महिलाना आर्थिक सशक्त करण्याबरोबरच त्यांना सन्मान केला असल्याचेही ते म्हणाले.
परळी येथील कृषी महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे एक कोटी शेतक-यांना राज्य शासनाच्या नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हफ्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे व आ. पंकजा मुंडे, पाशा पटेल इतर मान्यवरांच्या हस्ते रिमोटने वितरित करण्यात आला. तसेच राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सोयाबीन-कापूस उत्पादक शेतक-यांना द्यावयाच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या पोर्टलचेही अनावरण करण्यात आले.
२१ ऑगस्ट रोजी परळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य सभामंडपामध्ये या कृषी महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कृषी प्रदर्शनाच्या भव्य सभामंडपास शेतकरी नेते स्व. पंडित अण्णा मुंडे यांचे नाव देण्यात आले आहे. उद्घाटन समारंभाच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य रॅली द्वारे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून पाच दिवसीय भव्य असे कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन, धान्य महोत्सवच, र्चासत्रे व संवाद, विविध आधुनिक अवजारांची प्रात्यक्षिके, रानभाज्या महोत्सव, यशस्वी शेतक-यांचा सन्मान व त्यांच्या यशोगाथा, त्याचबरोबर महिला बचत गटांनी बनवलेल्या विविध उत्पादनांची विक्री, शेतीतील वेगवेगळ्या उत्पादनांची उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिके, यांसह शेतक-यांना मार्गदर्शक ठरणा-या असंख्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.