23.5 C
Latur
Sunday, October 13, 2024
Homeमहाराष्ट्रछ. संभाजीनगरात १० ठिकाणी आगीच्या घटना

छ. संभाजीनगरात १० ठिकाणी आगीच्या घटना

छत्रपती संभाजीनगर : देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात असतानाच दुसरीकडे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर शहरात आगीच्या वेगवेगळ्या घटनांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनांमध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान, आगीच्या घटनेत १५ लाखांचे नुकसान झाले आहे. तर, काही फायर कॉलनंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याचे पाहायला मिळाले.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री दहाच्या सुमारास छ. संभाजीनगर शहरातील विविध ठिकाणी आग लागल्याच्या तब्बल दहा घटना घडल्या. या सर्व आगीच्या घटना किरकोळ असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन अग्निशमन विभागाला त्याबाबत सूचना दिल्याने सुदैवाने मोठी हानी टळली. या घटनांमध्ये कोणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख शिवाजी झनझन यांनी दिली.

लक्ष्मीपूजनानिमित्त उडवल्या गेलेल्या फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी कचरा पेटल्याने आग लागल्याचे समोर आले. शहरात एकूण १० ठिकाणी आगीच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, या सर्व आगीच्या घटना किरकोळ असून यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. या घटनांमध्ये आगीमुळे १५ लाखांचे नुकसान झाले आहे.

कोठे कोठे लागली आग?
शहरात लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये दिवाण देवडी, उस्मानपुरा, सातारा परिसर नक्षत्रवाडी, पानचक्की परिसर, चिकलठाणा परिसर या ठिकाणी आग लागली. नक्षत्रवाडीतील एका-एका सोसायटीतील सहाव्या मजल्यावर आग लागली होती. यामध्ये संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. छत्रपतीनगरात अय्यप्पा मंदिरासमोरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रॉकेट खोलीत घुसल्याने शैक्षणिक साहित्याला आग लागली. पण ती वेळीच नियंत्रणात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR