सांगली : डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रहार पाटील यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन या निर्णयाची माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.
चंद्रहार पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. आता चंद्रहार पाटील यांनी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बरोबर एक वर्षाने चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.
प्रत्यक्ष सहभाग महत्वाचा : चंद्रहार पाटील
राज्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना, ब-याच त्रुटी, अडचणी, गैरप्रकार मी अनुभवलेले आहेत. अशा बाबींविरुद्ध मी वेळोवेळी आवाज देखील उठवला आहे. परंतु, प्रत्यक्ष शासन सहभागाशिवाय असे प्रश्न मार्गी लागणे कठीण आहे. म्हणून क्रीडा क्षेत्रामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी, मी आणि माझ्या सहका-यांनी सरकार सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे असे चंद्रहार पाटील म्हणाले.
मंत्री शिरसाट यांचा दावा खरा ठरला
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी ४ जूनला महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील सोमवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हिंमत असेल तर थांबवा, असे चॅलेंज ठाकरेंच्या शिवसेनेला दिले होते. त्यावेळी चंद्रहार पाटील यांनी मी अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेतच असून पक्ष सोडण्याबाबत अजून निर्णय घेतला नाही. शिंदेंच्या शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाबाबत मला ऑफर आहे असे म्हटलें होते. आता चंद्रहार पाटील यांचा निर्णय झाला आहे.