मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात आणि देशात गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशी आणि रोहिंगे रहिवाशी असल्याचा मुद्दा चर्चेत आहे. विशेषत: मुंबईत अनेक ठिकाणी पोलिसांच्या कारवाई बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. त्यामध्ये काही महिला आहेत. राज्य सरकारने हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्राच्या अनुषंगाने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जन्मू-मृत्यू नोंदणी अधिनियमात बदल केला आहे. जन्म किंवा मृत्यूच्या नोंदीसाठी पुरावे दाखल न केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियमात बदल केला असून जन्म अथवा मृत्यू प्रमाणपत्रांसाठी पुरावे नसताना अर्ज केल्यास अर्जदाराविरुद्ध आता थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. एका वर्षापेक्षा जास्त विलंबाच्या जन्म-मृत्यू नोंदी घेण्याबाबतची कार्यपध्दतीही निश्चित केली आहे. ज्या ठिकाणी जन्म झाला, त्या ठिकाणच्या नोंदी तपासूनच प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
ग्रामसेवक, जन्म मृत्यू निबंधक, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी जन्मदाखल्यासंदर्भात कोणत्या पद्धतीने कामकाज करावे, ही सांगणारी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. तसेच या नोंदी चुकीच्या आणि अर्जातील माहिती खोटी आढळली तर फौजदारी कारवाई होणार आहे.