पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांसाठी आज मंगळवारी (२७ ऑक्टोबर) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघांसह पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत पाच जागांसाठी एकूण १८२ उमेदवार रिंगणात असून, सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.
या निवडणुकीत महायुतीतील काही लोकांनी बंडखोरी केल्याने असेच काहीसे चित्र महाविकास आघाडीतही पाहायला मिळाल्याने ही निवडणूक चुरशीची झाली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत कोणाचा गुलाल उडणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. परंतु, या मतमोजणीला सुरुवात होताच पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. या गोंधळानंतर या ठिकाणची मतमोजणी थांबवण्यात आाली.
विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरू असताना, पुणे पदवीधर मतदारसंघाच्या केंद्रावर महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा जाधव यांनी मतपेट्यांच्या सीलबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, केंद्रावर आणलेल्या ८ मतपेट्यांना योग्यरीत्या सील लावण्यात आलेले नव्हते. या मुद्द्यावरून तिथे उपस्थित मविआचे कार्यकर्ते आणि उमेदवारांनी जोरदार आक्षेप नोंदवला, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. निवडणूक अधिका-यांनी यावर तातडीने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र गोंधळामुळे मतमोजणीची प्रक्रिया तात्पुरती थांबवावी लागली. याबाबत महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले.
या गोंधळाबाबतची माहिती देताना मविआच्या प्रतिनिधींनी सांगितले की, महाविकास आघाडीचे सर्व प्रतिनिधी एकत्र जमले आहेत, आतमध्ये तारा आणि सील तुटलेले असताना आम्ही त्यावरती आक्षेप घेतला, त्यावरती आम्हाला सांगितले गेले हे बरोबर आहे, आमची तक्रार देखील नोंद करून घेतली नाही, व्हिडीओ रेकॉर्डिंग केले, आम्हाला सांगितले की ते व्हिडीओ रेकॉर्डिंग आम्ही तुम्हाला देऊ, पण ते देणार कधी, आज निवडणूक आहे, तेथील निवडणुकीतले निरीक्षक आहेत.
















