नवी दिल्ली : लोकसभेत आज राहुल गांधी यांच्या भाषणावेळी गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरळीत होण्यास सुरुवात झाली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, तसेच हो, हा चीन आणि पाकिस्तानशी संबंधित राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे असे त्यांचे विधान पुन्हा मांडले.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यावर आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेते सभागृहाच्या दिशा चुकवत आहेत, असे सांगितले. अध्यक्षांच्या बैठकीत झालेल्या चर्चेचा संदर्भ देत रिजिजू म्हणाले, आम्ही येथे एकतेसाठी आहोत, परंतु त्यांनी विषय सोडून दिला.
राहुल गांधी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा नरवणे यांच्या आत्मचरित्राचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांना बोलण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप केला. ते म्हणाले मी विरोधी पक्षनेता आहे, मला बोलू द्या. पूर्व लडाखमध्ये भारतीय सैनिक मारले, असा उल्लेखही त्यांनी केला. यावेळी लोकसभेत गोंधल निर्माण झाला. या गोंधळावरुन आता आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केलेल्या खासदारांमध्ये माणिकम टागोर, किरण कुमार रेड्डी, प्रशांत पडोले, हिबी एडन, डीन कुरिया कोसे, एस. वेंकटेशन, गुरजीत सिंग औजला आणि अमरेंद्र सिंग राजा वारिंग यांचा समावेश आहे. या अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी एकूण आठ विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
अध्यक्षांना मित्र असे संबोधल्यावरून वाद
एका सदस्याने अध्यक्षांना मित्र असे संबोधले. अध्यक्षांनी त्यांना फटकारले आणि म्हटले ही संसद आहे. त्यावेळी कृष्णा प्रसाद टेनेटी अध्यक्षस्थानी बसले होते. या मित्र मुद्यावरून लोकसभेत गोंधळ उडाला. दरम्यान, विरोधी पक्षनेत्याला बोलू दिले जात नसल्याने विरोधी पक्षाचे खासदारही संतापले. अध्यक्षांवर कागदपत्रेही फेकण्यात आली.
विरोधी पक्षाच्या खासदारांनीही
दिला बोलण्यास नकार
यानंतर अध्यक्षस्थानी बसलेल्या टेनेटी यांनी राहुल गांधींना लोकसभेत बोलण्यापासून रोखले आणि समाजवादी पक्षाचे नरेश उत्तम पटेल यांना पुढील अध्यक्ष म्हणून नियुक्त केले, पण पटेल यांनी बोलण्यास नकार दिला. त्यानंतर अध्यक्षांनी तृणमूल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या खासदारांना बोलण्यास सांगितले, परंतु सर्व विरोधी खासदारांनी नकार दिला. सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ वेलमध्ये धाव घेतली आणि अध्यक्षांकडे कागदपत्रे फेकली. या गोंधळामुळे कामकाज विस्कळीत झाले आणि सभापती कृष्ण प्रसाद टेनेटी यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब केले.

