नवी दिल्ली : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य ग्राहक आणि व्यापा-यांना मोठा दिलासा देणारा निर्णय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) घेतला आहे. यूपीआयद्वारे होणा-या विशिष्ट मर्चंट व्यवहारांवर लागू करण्यात येणारे मर्चंट डिस्काउंट रेट(एमडीआर) शुल्क १५ ऑक्टोबरऐवजी आता दिवाळीनंतर लागू करण्यात येणार आहे. एनपीसीआयच्या यूपीआय अँड सर्व्हिसेस स्टीअरिंग कमिटी च्या बैठकीत मंगळवार दि. १३ ऑक्टोबर रोजी यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
डिजिटल इंडियाचा डंका पिटणा-या मोदी सरकारने आता स्मार्ट पेमेंट्सवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार, व्यापा-यांना २,००० पेक्षा जास्त रकमेच्या सर्व वढक व्यवहारांवर कर भरावा लागणार होता. हा नियम येत्या १५ ऑक्टोबर पासून लागू होणार होता. मात्र मोदी सरकारच्या या निर्णयाला देशभरातून होणा-या विरोधामुळे सरकारने आता हे शुल्क लागू करण्याची तारिख पुढे ढकलली आहे. आता हे शुल्क दिवाळीनंतर लागू केले जाणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मंगळवारी ही माहिती दिली.
सणांच्या खरेदी हंगामात कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने याबाबत एक निवेदन देत हा निर्णय जाहीर केला.
सणासुदीमुळे निर्णय मागे
हे प्रस्तावित शुल्क आधी १५ ऑक्टोबरपासून लागू करण्याचे नियोजन होते. मात्र, सणासुदीच्या काळात याचा थेट फटका व्यापारी आणि ग्राहकांना बसू नये, म्हणून व्यापारी संघटना, फिनटेक कंपन्या आणि डिजिटल पेमेंट संस्थांनी हा निर्णय काही काळ स्थगित करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत एनपीसीआयने या अंमलबजावणीला मुदतवाढ दिली आहे.
किती शुल्क आकारणार?
– २,००० रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी कोणतेही शुल्क नाही.
– २,००० रुपयांपेक्षा जास्त पेमेंटसाठी व्यापा-याला ०.४ टक्के एमडीआर लागेल.
– ७५,००० रुपये आणि त्यावरील पेमेंटसाठी प्रति व्यवहार कमाल एमडीआर मर्यादा ३०० रुपये असेल. म्हणजेच, एक लाखाच्या पेमेंटसाठी ०.४ टक्के शुल्क ४०० नसून ३०० रुपये असेल.
नवीन एमडीआर नियम काय?
यूपीआयद्वारे २००० रुपयांपेक्षा जास्त पेमेंट आकारल्यास व्यापा-यांना हे शुल्क भरावे लागेल. हे शुल्क ग्राहकांवर आकारले जाणार नाही. ग्राहकांसाठी यूपीआय पूर्वीप्रमाणेच विनामूल्य राहील. हा नियम १५ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होईल. हे शुल्क व्यक्ती-ते-व्यापारी व्यवहारांवर लागू होईल. व्यक्ती-ते-व्यक्ती पेमेंट पूर्वीप्रमाणेच पूर्णपणे विनामूल्य राहतील. तथापि, वस्तूंच्या खरेदीसाठी केलेल्या पेमेंटवर देखील हे शुल्क आकारले जाईल. हे शुल्क व्यापा-याला भरावे लागेल.
















