मुंबई : प्रतिनिधी
देशात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात महाराष्ट्र सरकारच्यावतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे, तसेच कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राचे उद्घाटन गुरुवार दि. २४ जुलै रोजी होणार असून या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी येथे दिली.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला आपण दोन महिन्यापूर्वी भेट दिली होती. तेथील कुलगुरुंशी चर्चा केल्यानंतर १६ वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारने तेथे मराठी भाषा अध्यासन केंद्रासाठी २ कोटी रूपये दिल्याचे समजले. त्यासाठी त्यांनी आणखी तीन कोटीची मागणी केली असता मराठी भाषा विभागाचा मंत्री म्हणून तो निधी देण्याचा निर्णय त्याच क्षणी घेतला. पण त्या मराठी अध्यासन केंद्राला कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्र असे नाव द्यावे अशी सूचना केली असता त्यांनी ती मान्य केल्याचे सामंत यांनी सांगितले. तसेच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अध्यासन केंद्रासाठी १० कोटी रुपये वर्ग केले होते असे सामंत यांनी सांगितले.
आता गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्र आणि व्यक्तिमत्वावर अभ्यास करण्यासाठी सुरु होणा-या अध्यासन केंद्राचा उद्घाटन सोहळा होणार आहे. दिल्लीत मराठी भाषेचे अध्यासन केंद्र सुरु करणे हे मराठी माणसासाठी अभिमानाचे आहे. मराठी भाषेला सातासमुद्रापार घेऊन जाता येत असेल, देशाच्या कानाकोप-यात मराठी पोहोचवायची असेल तर दिल्लीतील जेएनयूसारख्या विद्यापीठात अध्यासन केंद्र होणे गरजेचे होते असेही सांमत म्हणाले.
विद्यापीठात शिवरायांचा पुतळा उभारण्याचा मानस
जेएनयूमध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस आहे. विद्यापीठाच्या कुलगुरूंनी जेएनयूमध्ये जागा उपलब्ध देण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. त्यानुसार त्यांनी जागा दिली तर त्यासाठी लागतील तेवढे पैसे द्यायला महाराष्ट्र सरकार तयार असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.
















