मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही मंत्र्यांची त्यांच्याच गटातील आमदारांनी तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. काही आमदारांनी २ ते ३ मंत्र्यांची तक्रार केल्याची माहिती आहे. आमदारांची कामे होत नाहीत अशी तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मंत्र्यांना वेळोवेळी सांगूनदेखील कामे करत नाहीत अशी तक्रार त्यांनी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना तंबी दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याआधीही आमदारांनी या ३ मंत्र्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता १५ ते १६ आमदारांनी या ३ मंत्र्यांबाबत पुन्हा एकदा कामे करत नसल्याची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. पक्षातील आमदार शिवसेना मंत्र्यांकडे काम घेऊन आल्यानंतर काम होत नसल्याची तक्रार आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
आमदारांनी याबाबतची नाराजी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवली. आमदारांच्या नाराजी नाट्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना तंबी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पक्षातील सर्व विधानसभा सदस्यांना अधिवेशन कालावधीत जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत.
दरम्यान हिवाळी अधिवेशनानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. अशातच काही मंत्र्यांची खाती किंवा आमदार बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे ३ मंत्री कोण आहेत याबाबतची माहिती समोर आलेली नाही. आगामी निवडणुका आणि कामे यामुळे एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.