मुंबई : प्रतिनिधी
यंदापासून राज्य महोत्सव म्हणून साजरा होणा-या गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्य, स्पर्धा, रोषणाईसह व्याख्याने, लोककलांच्या आविष्काराच्या भरगच्च कार्यक्रमांसाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी या महोत्सवासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या गणेशोत्सवाचे महत्त्व आणि ओळख संपूर्ण जगभर व्हावी. आपल्या परंपरेची आधुनिकतेशी सांगड घातली जावी, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्टया महत्त्वाचे असणारे गणेशोत्सव हे व्यासपीठ आणखी मजबूत व्हावे. गणेशोत्सवासंबंधी सर्व घटक एकत्र जोडले जावेत. राज्यात पर्यटन वाढावे, आपल्या समृद्ध परंपरा रितीरिवाजांचे जतन-संवर्धन व्हावे आणि महाराष्ट्राचे स्थान जगाच्या नकाशावर अधोरेखित व्हावे, या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड . आशिष शेलार यांनी केली होती. या संदर्भात चार वेगवेगळे शासन निर्णयही निर्गमित झाले आहेत.
भारतीय सैन्य दलाने फत्ते केलेले ऑपरेशन सिंदूर आणि स्वयंपूर्ण तसेच आत्मनिर्भर भारत निर्माणासाठी स्वदेशीचा जागर हे दोन विषयही या निमित्ताने राज्य महोत्सवाशी जोडण्यात येत आहेत. अध्यात्म, भक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक असणारा सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षीपासून राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने आज अनावरण करण्यात आलेले बोधचिन्ह गणेश उत्सवात सर्वत्र वापरले जाणार असल्याची माहिती अॅड. शेलार यांनी दिली आहे.

