मॉस्को : भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी गुरुवार दि. २१ ऑगस्ट रोजी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव यांची मॉस्कोमध्ये भेट घेतली. यादरम्यान, भारत-रशिया द्विपक्षीय धोरणात्मक संबंधांना एक नवीन दिशान देण्यावर चर्चा झाली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना रशियन तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर लादलेल्या अमेरिकन शुल्कावर प्रतिक्रिया दिली.
जयशंकर म्हणाले की, भारत नाही, तर चीन रशियन तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. भारत हा सर्वात मोठा एलएनजी खरेदीदारदेखील नाही. युरोपियन युनियन रशियाकडून सर्वाधिक एलएनजी खरेदी करते. २०२२ नंतर भारताने रशियासोबत सर्वात मोठी व्यापार वाढही केलेली नाही, दक्षिणेत काही देशांचा अधिक व्यापार आहे. मात्र, अमेरिकेने रशियाकडून तेल आयात करण्यासाठी चीनवर अद्याप कोणतीही बंदी का घातलेली नाही, हे आम्हाला समजत नाही, अशी प्रतिक्रिया जयशंकर यांनी दिली.
अमेरिकेचा युक्तिवाद समजण्यापलीकडे
जयशंकर पुढे म्हणाले, अमेरिका गेल्या अनेक वर्षांपासून म्हणत आहे की भारताने रशियाकडून तेल खरेदी करून जागतिक ऊर्जा बाजारपेठ स्थिर करण्यास मदत करावी. मात्र, आता अमेरिका रशियन तेल खरेदी केल्यामुळे भारतावर अतिरिक्त शुल्क लादतो भारत फक्त रशियाकडून नाही, तर अमेरिकेकडूनही तेल खरेदी करतो आणि त्याचे प्रमाण काही काळापासून वाढले आहे. त्यामुळेच अमेरिकेचा युक्तिवाद आमच्या समजण्यापलीकडे आहे.
भारत-रशिया संबंध मजबूत
भारत आणि रशिया हे जगातील सर्वात स्थिर संबंध असलेल्या देशांमध्ये आहेत. आमच्यात ऊर्जा सहकार्य, व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि लष्करी तांत्रिक सहकार्य मजबूत आहे. रशिया भारताच्या मेक इन इंडिया ध्येयांना पाठिंबा देतो. दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापार वाढवण्याच्या सामायिक महत्त्वाकांक्षेचा पुनरुच्चार केला. कृषी, औषध आणि वस्त्रोद्योग यासारख्या क्षेत्रात भारताची निर्यात वाढवल्याने व्यापार असंतुलन सुधारण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रियाही जयशंकर यांनी व्यक्त केली.

