बीजिंग : अमेरिका आणि इराणमधील वाढत्या युद्धजन्य तणावाचा सर्वाधिक तडाखा आता जगाची मॅन्युफॅक्चरिंग हब असलेल्या चीनला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मॉडर्न डिप्लोमसीच्या ताज्या अहवालानुसार कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि कच्च्या मालाची टंचाई यामुळे चीनच्या उत्पादन क्षेत्राची कंबर मोडली आहे. यामुळे चीन कॉस्ट-पुश इन्फ्लेशन म्हणजेच उत्पादन खर्च वाढल्यामुळे येणा-या महागाईच्या जाळ्यात अडकण्याची भीती व्यक्त होत आहे.
चीन गेल्या अनेक महिन्यांपासून डिफ्लेशन (किमती कमी होणे आणि मंदीसदृश स्थिती) या संकटाशी झुंजत आहे. आता युद्धाच्या ठिणगीमुळे ऊर्जा महागल्याने चीन तांत्रिकदृष्टया डिफ्लेशनमधून बाहेर पडेल पण ते लक्षण सुदृढ अर्थव्यवस्थेचे नसेल. कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढला असला तरी, ग्राहकांकडे खरेदीची शक्ती नसल्यामुळे कंपन्या हा भार त्यांच्यावर टाकू शकत नाहीत. परिणामी, कंपन्यांचा नफा संपुष्टात येत आहे. नफा घटल्यामुळे कंपन्यांनी नवीन भरती थांबवली असून अनेक ठिकाणी कर्मचा-यांच्या वेतनात कपात केली जात आहे. चीनसाठी हे संकट इकडे आड आणि तिकडे विहीर असे आहे. मंदीतून बाहेर पडण्यासाठी चीनला महागाई हवी होती, पण ती ‘मागणी’ वाढल्यामुळे येणारी हवी होती. युद्धाने दिलेली ही खर्च-आधारित महागाई चीनच्या उत्पादक कंपन्यांना दिवाळखोरीकडे नेऊ शकते. याचा परिणाम केवळ चीनवरच नाही, तर जागतिक पुरवठा साखळीवरही होणार आहे.
बेरोजगारीचा आलेख उंचावला
चीनमधील उत्पादन क्षेत्रातील सुमारे २५ टक्के कंपन्या सध्या तोट्यात चालत आहेत. अति-उत्पादन क्षमता आणि तीव्र स्पर्धेमुळे कंपन्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
पगारवाढीला ब्रेक
गेल्या वर्षभरात अर्ध्याहून अधिक कर्मचा-यांना कोणतीही पगारवाढ मिळालेली नाही.
युवा बेरोजगारी
चीनमधील तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण चिंताजनक आहे. शेकडो अर्ज करूनही नोकरी मिळत नसल्याने तरुणांमध्ये असंतोष वाढत आहे.
कमी खर्च
उत्पन्न थांबल्यामुळे चिनी नागरिकांनी आपला खर्च मर्यादित केला आहे, ज्याचा थेट परिणाम देशांतर्गत मागणीवर झाला आहे.
जीडीपी वाढीला घरघर लागण्याची भीती
चीनची अर्थव्यवस्था प्रामुख्याने निर्यातीवर अवलंबून आहे. मात्र, जागतिक स्तरावर ऊर्जा महागल्याने इतर देशांची खरेदी क्षमताही कमी झाली आहे.
निर्यात थंडावली
ऊर्जेच्या किमती वाढल्यामुळे चीनच्या वस्तू महाग होत आहेत, ज्यामुळे जागतिक बाजारात त्यांच्या निर्यातीला फटका बसत आहे.
विकासदर धोक्यात
अर्थशास्त्रज्ञांच्या मते, जर कच्च्या तेलाच्या किमती अशाच वाढत राहिल्या, तर चीनच्या जीडीपी विकासदरात मोठी घट होऊ शकते.

