23 C
Latur
Wednesday, December 4, 2024
Homeसोलापूरचिंचोली एमआयडीसीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविणार

चिंचोली एमआयडीसीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविणार

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीमध्ये एक महिन्यापासून पाणी पुरवठा विस्कळित होता. पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने येथील काही उद्योग बंद होण्याच्या मार्गावर होते.

सोलापूर महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात विसंवादामुळे येथील उद्योजकांना पाणी समस्येचा त्रास सहन करावा लागत होता. उद्योजकांच्या या प्रश्नावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यशस्वी तोडगा निघाला आहे. चिंचोली येथील उद्योगाला चोवीस तास साडेबारा एमएलडी पाणी पुरवठा केला जाणार आहे.

चिंचोली एमआयडीसीतील उद्योजकांना भेडसावणारा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सोलापूर इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष राम रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत जवळपास ३० उद्योजकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत जवळपास एक तास चर्चा झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी मूळ प्रश्न समजून घेत महापालिका व एमआयडीसी यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिका-यांच्या पुढाकाराला महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले व एमआयडीसीचे अभियंता अशोक मगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे उद्योजकांच्या पाणी प्रश्नावर तात्पुरता तोडगा निघाला आहे.

एमआयडीसीकडे पाणी साठवण्याची कमी क्षमता असल्याने पाणीटंचाईचे संकट उद्भवल्याचे महापालिका सांगत होती. महापालिकेने पाणीपुरवठ्याची वेळ कमी केल्यामुळे ही अडचण असल्याचे एमआयडीसीकडून उद्योजकांना सांगण्यात येत होते. दोन शासकीय यंत्रणांची दोन वेगवेगळी उत्तरे ऐकून उद्योजक हतबल झाले होते. एमआयडीसीने पाण्याची साठवण क्षमता वाढवावी यासाठी दोन ते तीन वर्षांपासून उद्योगमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जात आहे. पाणी साठवण क्षमता वाढविल्यानंतर हा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल असा विश्वास उद्योजकांनी व्यक्त केला.

एक महिन्यात हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी व्यक्त केल्याचे अध्यक्ष राम रेड्डी यांनी सांगितले. या बैठकीसाठी महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, असोसिएशनचे सचिव वासुदेव बंग, सहसचिव अभिषेक तापडिया, केशव रेड्डी, जयपाल महिंद्रकर, कमलेश शहा, तारासिंग राठोड, विनायक दुधगी यांच्यासह जवळपास ३० उद्योजक उपस्थित होते. जिल्हाधिका-यांनी योग्य समन्वयक घडवून हा प्रश्न सोडविल्याने उद्योजकांनी समाधान व्यक्त केले.

चिंचोली एमआडीसी पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाची एमआयडीसी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे उद्योजकांनी या बैठकीत आपल्या भावना व्यक्त केल्या. उद्योगात असणा-या अडचणी यावर तोडगा काढण्याचे आव्हान समोर असताना शासनाच्या स्तरावर उद्योगांसाठी अनुकूल धोरण नसल्याने त्यांची अडचण होत आहे. पाण्यासारख्या सुविधांसाठी अडचणी येत असल्याचे अनेक उद्योजकांनी यावेळी सांगीतले.

पाण्याअभावी कोणतेही युनिट बंद पडू नये युनिट बंद पडल्यानंतर त्याचा फटका उद्योजक व कामगारांना बसू नये यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व एमआयडीसीच्या अधिका-यांनी सकारात्मकता दाखविली. त्यांच्या सकारात्मकतेमुळे उद्योजकांचा प्रश्न तात्पुरता सुटला आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी आम्ही आणखी पाठपुरावा करणार आहोत असे सोलापूर इंडस्ट्री असोसिएशन, चिंचोली एमआयडीसी सोलापूरचे अध्यक्ष राम रेड्डी यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR