नांदेड : प्रतिनिधी
जिल्ह्यातील घरेलू कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी घर कामगार संघटनेच्या वतीने सोमवारी महात्मा फुले पुतळा, आयटीआय कॉर्नर येथून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. सीटू संलग्न घर कामगार संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या जुन्या तसेच नव्याने लागू करण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, पात्र कामगारांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा आणि योजनांच्या अंमलबजावणीत अनियमितता आढळल्यास दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्तांना सादर करण्यात आले.
संघटनेने जुन्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच नवीन शासन निर्णय व योजनांची अधिकृत माहिती कामगार संघटना आणि कामगारांना लेखी स्वरूपात देण्याची मागणी केली आहे. सन्मानधन योजनेचा पात्र नोंदणीकृत घरेलू कामगारांना नियमित लाभ मिळावा, नोंदणी व नूतनीकरणाची प्रक्रिया सुलभ करून विशेष नोंदणी मोहीम राबवावी, तसेच अपघात, मृत्यू, अंत्यविधी, प्रसूती, शिक्षण व इतर कल्याणकारी योजनांची तालुकानिहाय जनजागृती करावी, पात्र यादीत बनावट नावे टाकणा-यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
मोचार्नंतर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व घर कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड, कार्याध्यक्ष कॉ. उज्ज्वला पडालवार आणि सरचिटणीस कॉ. करवंदा गायकवाड, जमसं जिल्हाध्यक्ष कॉ.लता गायकवाड, सुभाषचंद्र गजभारे, मंगेश वट्टेवाड, राहुल नरवाडे, अरुणा जोगदंड, मंदा नेहारे, सुरेखा कांबळे आदींनी केले.
















