17.9 C
Latur
Friday, December 13, 2024
Homeमहाराष्ट्रबीडमध्ये मतदान केंद्राबाहेरच तुंबळ हाणामारी

बीडमध्ये मतदान केंद्राबाहेरच तुंबळ हाणामारी

मुंबई, नवी मुंबईत राडा

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून, आज, राज्यात ठिकठिकाणी परस्परविरोधी गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, वाद, शाब्दिक चकमकी झडल्याचे चित्र होते. नाशिकमधील येवला, नांदगाव आणि मुंबईतील वरळीतील काही घटनांनंतर आता बीडच्या केज मतदारसंघ, ऐरोलीमधील कोपरखैरणे विभाग, मुंबईतील सायन कोळीवाडा, कोल्हापुरातील कसबा-बावडा परिसरात हाणामारी, शाब्दिक चकमक आणि वाद झाले. त्यामुळं ऐन थंडीत राजकीय आखाड्यातील पारा प्रचंड वाढल्याचे दिसून आले.

विडा गावात तुंबळ हाणामारी
बीडच्या केज मतदारसंघातील विडा गावात मतदान केंद्राबाहेरच दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. त्यामुळे बराच वेळ तणाव निर्माण झाला होता. केंद्राबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मतदान करण्यावरून ही हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून ही हाणामारी झाली. यानंतर काही काळ मतदान केंद्रावर तणाव होता. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वातावरण निवळले. पण तणाव कायम असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला.

भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलाला मारहाण
ऐरोली विधानसभा मतदारसंघातील कोपरखैरणे विभागात मोठा राडा झाला. स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांनी भाजपचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या मुलाला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.

कोपरखैरणे येथील कार्यालयाबाहेर लागलेल्या बूथवर येऊन मारहाण करण्यात आली. तर शंकर मोरे यांच्या मुलाने कोपरखैरणे येथे स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप अंकुश कदम यांनी केला. कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलो असता शंकर मोरे यांच्या मुलाने सुरुवातीला अंगावर हात उचलल्याने स्वरक्षणासाठी आम्ही देखील मारहाण केल्याचे अंकुश कदम यांनी सांगितले.

भाजप कार्यकर्ते-पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक
सायन कोळीवाडा मतदारसंघात पोलिस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झडली. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मतदारांवर प्रभाव टाकल्याचा आरोप भाजपने केला. तर पोलिसांकडून काँग्रेसला मदत होत असल्याचा आरोपही करण्यात आला. भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी याबाबत पोलिसांना जाब विचारला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR