मुंबई : प्रतिनिधी
सत्ताधारी व विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांची लढाई आता मुद्यावरून गुद्यांवर आली आहे. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात चांगलीच जुंपली होती. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याने राजकीय संघर्ष आता कोणत्या स्तरावर जाणार असा प्रश्न पडला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी विधानभवन परिसरात जात असताना “मंगळसूत्र चोराचा…मंगळसूत्र चोराचा.., अशा घोषणा दिल्या होत्या. आव्हाड यांचा हा व्हीडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावरुन, जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर भिडले होते. सोशल मीडियातून दोन्ही नेत्यांचा व्यंगात्मक फोटो व्हायरल केले जात होते.
आज हे दोन्ही नेतेच विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर एकमेकांना भिडले. गोपीचंद पडळकर यांनी कारमधून उतरताना गाडीचा दरवाजा जोरात ढकलला. मात्र, मुद्दाम हा दरवाजा जोरात ढकलला आणि तो मला लागल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यावरुन, या दोन नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे. एकमेकांना शेलक्या शब्दात आव्हान दिले.
















