25.3 C
Latur
Saturday, November 8, 2025
Homeमहाराष्ट्र’बेस्ट’ पराभवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट?

’बेस्ट’ पराभवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट?

मुंबईतील वाहतूक समस्येसंदर्भात भेट घेतल्याचे राज ठाकरेंचे स्पष्टीकरण

मुंबई : प्रतिनिधी
तब्बल दोन दशकांचा संघर्ष संपवून उद्धव व राज ठाकरे एकत्र आल्याने राजकारणाची समीकरणे बदलणार अशी चर्चा सुरू असताना बेस्ट पतसंस्थेच्या पहिल्याच निवडणूक ठाकरे बंधूंच्या युतीचा पराभव झाला. या पराभवामुळे ठाकरे ब्रँडच्या प्रभावाबद्दल वेगवेगळी मते व्यक्त होत असताना राज ठाकरे यांनी आज अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तब्बल ५० मिनिटे चर्चा झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राज ठाकरे भावाबरोबर राहणार की ‘देवा’बरोबर जाणार ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी मात्र शहर नियोजन व मुंबईतील वाहतूक समस्येसंदर्भात ही भेट झाल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी”च्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची युती झाली होती. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन उत्कर्ष पॅनल या निवडणुकीत उतरवले होते. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे निवडणूक छोटी असूनही सर्वांचे लक्ष लागले होते.

या निवडणुकीत कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनलला १४ , तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलला ७ जागा मिळाल्या होत्या. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळाली नाही. पहिल्याच निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीचा पराभव झाल्याने दोघांचे एकत्र येणे पुरेसे नाही अशी चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज सकाळी अचानक वर्षा शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे स्वाभाविकच वेगवेगळे तर्क व्यक्त होत आहेत.

भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी भेटीचे कारण स्पष्ट केले. शहर नियोजनाच्या संदर्भात आपण ही भेट घेतली. मुंबईत वाहतुकीचा व पार्किंगचा मुद्दा गंभीर बनत चालला आहे. लोक रस्त्यावर कुठेही कार, दुचाकी पार्क करतात. या पार्किंगच्या मुद्यावर मार्ग काढण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR