नवी दिल्ली/पुणे : देशातील उत्तरेकडील पंजाब, हरियाणा-चंडीगड, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमधील अनेक भागांमध्ये किमान तापमान ६ अंश सेल्सिअसच्या खाली राहील, तर दिल्ली, दक्षिण राजस्थान आणि उत्तर मध्य प्रदेशमध्ये १० ते १२ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
५ ते ११ जानेवारीदरम्यान रात्री आणि दिवसाच्या तापमानात घट होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये थंडीची लाट येऊ शकते.विभागानुसार अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र आहे. पुढील २४ तासांत ते उत्तरेकडे सरकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील २ दिवसांत लक्षद्वीपमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र
आयएमडीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे, त्यामुळे कोमोरिन क्षेत्र, दक्षिण पूर्व अरबी समुद्र, लक्षद्वीप आणि आसपासच्या दक्षिण पश्चिम अरबी समुद्रात ४५ ते ५५ किमी प्रति तास वेगाने वा-याची शक्यता आहे. मच्छिमारांना सतर्कतेच्या ठिकाणी समुद्रात जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे.