पुणे/मुंबई : प्रतिनिधी
नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असताना राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील शीतलहरी हळूहळू दक्षिणेकडे सरकत असल्याने महाराष्ट्रातील हवामानात लक्षणीय बदल जाणवत आहेत. राज्यभरातच थंडीचा कडाका वाढला आहे. विशेषत: पहाटे आणि रात्रीच्या सुमारास गारठा अधिक वाढत आहे. दिवसा काही काळ ऊबदारपणा जाणवत असला, तरी एकूणच थंडीचा प्रभाव कमी झालेला नाही.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, डिसेंबरअखेर वा-यांच्या दिशेत बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. याचा थेट परिणाम तापमानावर झाला. रविवारी महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत हवामान कोरडे होते. कोरड्या हवामानासोबतच थंडीचा जोर राज्याच्या अनेक भागांत कायम राहते. उत्तर भारतात सक्रिय झालेल्या तीव्र थंडीच्या लाटेचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. त्यामुळे सकाळी लवकर घराबाहेर पडणारे नागरिक, शेतकरी आणि कामगार वर्गाला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे.
दाट धुक्याचा इशारा
हवामान खात्याने उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये एक जानेवारीपर्यंत दाट धुक्याचा इशारा दिला आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील काही भागांत पहाटे धुक्याची चादर पसरलेली दिसून येईल. विशेषत: महामार्गांवर आणि ग्रामीण भागांत वाहनचालकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाड्यात आणखी घट होणार
मराठवाड्याच्या अंतर्गत भागांमध्ये, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पुण्यासह मध्य महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा प्रभाव कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. विदर्भात पुन्हा एकदा तापमान दहा अंशाखाली जाण्यास सुरुवात झाली आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर कायम राहणार आहे. काही ठिकाणी किमान तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याचा अंदाज आहे. पुण्यात आकाश मुख्यत: निरभ्र राहणार असून सकाळच्या वेळेत विरळ धुक्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रातही पहाटे आणि संध्याकाळनंतर तापमान घटताना दिसेल.

