भोपाळ : उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा प्रभाव कायम आहे. पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या अनेक भागांमध्ये रविवारी किमान तापमान तीन ते सात अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले. मध्य प्रदेशात बर्फाळ वा-यांनी थंडी वाढवली आहे.
हवामान विभागाने सोमवारी मध्य प्रदेशात थंडीच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. भोपाळमध्ये गेल्या ३ दिवसांपासून थंडीची लाट सुरू आहे. येथे रविवारी पारा ७ अंशांपर्यंत खाली घसरला. १७ शहरांमध्ये तापमान १० अंशांपेक्षा कमी नोंदवले गेले. ग्वाल्हेर, चंबळ, उज्जैन आणि सागर विभागांमध्ये थंडीच्या लाटेचा प्रभाव सर्वाधिक आहे. राजस्थानमध्ये कडाक्याच्या थंडीत पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाला आहे. यामुळे जोधपूर, जैसलमेरसह काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहिले. किमान तापमानात २ ते ३ अंशांची वाढ झाली, ज्यामुळे लोकांना सध्या थंडीच्या लाटेपासून दिलासा मिळाला आहे. जम्मू-काश्मीरच्या अनेक भागांमध्ये तापमान शून्याखाली गेले आहे. रविवारी अमरनाथ यात्रा बेस कॅम्प जम्मू-काश्मीरमधील सर्वात थंड ठिकाण होते. येथे तापमान उणे ४.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. श्रीनगरमध्ये किमान तापमान उणे ०.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
जम्मू-काश्मीरमध्ये आज बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमधील ३ जिल्ह्यांमध्येही पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे. केदारनाथमध्ये रविवारी तापमान उणे १७ अंश सेल्सिअस आणि बद्रीनाथमध्ये उणे १४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

