मुंबई : प्रतिनिधी
दरवर्षीच्या परंपरेनुसार उद्धवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी तसेच एसआयआर प्रक्रिया रोखण्यासाठी विरोधकांचे जे आंदोलन सुरू आहे, त्यात उद्धवसेनाही सामील झालेली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेच्या दस-या मेळाव्याचा एक टिझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. संविधान रक्षणाची धगधगती मशाल बनून या, असे आवाहन या टिझरमधून करण्यात आले आहे.
२० ऑक्टोबर रोजी उद्धवसेनेचा दसरा मेळावा दादर येथील ऐतिहासिक शिवतीर्थ मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा पहिला ‘व्हिडिओ टिझर’ प्रदर्शित करण्यात आला असून, त्याद्वारे राज्यभरातील शिवसैनिकांना मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या व्हिडिओ टिझरमध्ये, संविधान रक्षणाची धगधगती मशाल बनून या, वाजत-गाजत गुलाल उधळत या!, असा मुख्य संदेश देण्यात आला आहे.
शिवसेना हा पक्ष नाही, शिवसेना हा विचार आहे. शिवसेना म्हणताना सळसळते आणि तापते रक्त हीच आमची ओळख आहे. निष्ठा हीच आमची ओळख आहे. प्रत्येकाच्या हृदयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…, अशी विधाने असलेला उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ या टिझरमध्ये दाखवण्यात आला आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे कोणती राजकीय भूमिका मांडतात. विरोधकांवर कसा हल्लाबोल करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जर आम्ही काही म्हटले तर आम्हाला देशद्रोही अशी उपमा दिली जाते. आता मला असे वाटते की, प्रशांत भूषण यांनी रेजीम चेंज म्हणजे सत्ता परिवर्तनाबाबत जे विधान केले होते. तोच खरा मुद्दा आहे. होय, आम्ही सत्तापरिवर्तनासाठी उभे आहोत. निवडणुकीच्या माध्यमातून आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार हिरावून घेतला जात असेल, तर आम्ही या सत्तेला उखडून टाकण्यासाठी उभे आहोत, त्यात चुकीचे काय आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
















