मुंबई : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मुंबई लोकलच्या मालाड स्थानकावर २४ जानेवारी २०२६ रोजी एन. एम. महाविद्यालयाचे प्राध्यापक आलोक सिंह यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी २७ वर्षीय ओंकार शिंदे याला अटक करण्यात आली होती. मात्र आता सहा महिन्यांनी पुन्हा एकदा मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण मंगळवारी (२३ जून) रात्री अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यान लोकल ट्रेनमध्ये प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या बहुप्रतीक्षित मान्सूनचे मंगळवारी अखेर संपूर्ण मुंबईसह राज्यभरात आगमन झाले. मात्र याच पावसाचा फटका मुंबई लोकलमधून प्रवास करणा-या एका प्रवाशाला बसला. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री १० च्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्यानंतर अंधेरी ते बोरिवली स्थानकारदरम्यान, लोकलमधून प्रवास करणा-या मयांक लोहार नावाच्या प्रवाशाने दरवाजावर उभ्या असलेल्या दुस-या प्रवाशाला दरवाजा बंद करण्यास सांगितले.
मात्र दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. मयांक लोहार याने दरवाजावर उभा राहून प्रवास करणा-या प्रवाशाला मारहाण केली. याचा आरोपीला राग आला आणि त्याने आपल्या बॅगेतून चाकू काढून मयांक लोहारवर सपासप वार केले.
आरोपीने अचानकपणे केलेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे मयांक लोहार हा तरुण गंभीररीत्या जखमी झाला. त्यामुळे त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने मयांक लोहरचा मृत्यू झाला. सदर घटना मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात घडली असून या घटनेचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
















