नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) वेळोवेळी आपले नियम बदलत असते. खरे तर मोबाईलचा अनुभव लोकांसाठी चांगला व्हावा, यासाठी ट्रायकडून नवनवीन निर्णय घेतले जातात. अनेकदा मोबाईल नेटवर्क प्रोव्हायडर्सना यात त्रास होतो. यामुळे कंपन्यांना काही वेळा दिलासाही मिळतो. मात्र, ट्रायच्या नव्या नियमावलीमुळे आता मोबाईल युजर्सना दिलासा मिळणार आहे. कारण नव्या नियमावलीत युजर्सना नुकसान भरपाई मिळण्यापासून सर्व गोष्टींची काळजी घेतली आहे. ट्रायचे हे नवे नियम ६ महिन्यांत लागू होणार आहेत.
खरे तर मोबाईल युजर्सना सातत्याने कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषत: पाऊस आणि इतर नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी हे दिसून येते. तसेच अनेकवेळा तक्रार करूनही त्या सोडविल्या जात नाहीत. त्यामुळे आता ट्रायने याबाबत डेडलाईन निश्चित केली आहे. ट्रायच्या म्हणण्यानुसार जर टेलिकॉम कंपनीने क्वॉलिटी स्टँडर्डचे पालन केले नाही, तर त्यांना मोठा दंड भरावा लागेल. पूर्वी दंडाची रक्कम ५० हजार रुपये होती. आता ती वाढवून १ लाख रुपये करण्यात आली आहे. अशा स्थितीत हा निर्णय टेलिकॉम ऑपरेटर्ससाठी डोकेदुखी ठरू शकतो.
ट्रायने आपल्या जुन्या नियमांमध्ये बरेच बदल केले आहेत. त्यात दंडाची रक्कमही वेगवेगळ््या स्वरूपात विभागण्यात आली आहे. ब्रॉडबँड आणि वायरलाईन, वायरलेस सर्व्हिसेस रेग्युलेशन २०२४ चे उल्लंघन केल्यास ही रक्कम भरावी लागणार आहे. दंडाची रक्कम १ लाख, २ लाख आणि १० लाख रुपये निश्चित केली आहे. म्हणजेच आता दंडही वेगळ््या पद्धतीने निश्चित केला आहे.
विशेष म्हणजे हा नियम केवळ मोबाईल कंपन्यांसाठी नाही, तर ब्रॉडबँड प्रोव्हायडर्सनाही लागू होणार आहे. सलग ३ दिवस ब्रॉडबँड सेवा बंद राहिल्यास कंपन्याना नुकसान भरपाई द्यावी लागेल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यांना नेटवर्क दुरुस्तीचे काम तात्काळ करावे लागेल. त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा उलट परिणाम होऊ शकतो, असेही नमूद केले आहे.
नेटवर्क ठप्प राहिल्यास सवलत द्यावी लागेल
ट्रायच्या नव्या नियमांनुसार एखाद्या जिल्ह्यात नेटवर्क बंद झाले तर टेलिकॉम कंपन्याना त्रास होणार आहे. हा फायदा प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही प्रकारच्या ग्राहकांना मिळणार आहे. आता त्यांना कनेक्शनची वैधता वाढवून मिळणार आहे. त्यासाठी ग्राहकांना काहीही करावे लागणार नाही. परंतु या बंदसाठी २४ तासांची मुदत दिली आहे. म्हणजेच एखादे नेटवर्क २४ तास बंद राहिले, तर टेलिकॉम कंपन्याना त्याची किंमत मोजावी लागेल. कारण त्यासाठी तेवढीच सवलत द्यावी लागणार आहे.
…तर एक दिवस अधिक वैधता
ट्रायच्या नव्या नियमावलीनुसार ग्राहकांना फायदा होऊ शकतो आणि टेलिकॉम कंपन्यांना नुकसान सहन करावे लागू शकते. कारण एखादे नेटवर्क १२ तास बंद पडले, तर तो १ दिवस गणला जातो. त्यानुसार जर एखादे नेटवर्क १२ तास बंद पडले, तर कंपन्यांना ग्राहकांसाठी १ दिवस अधिक वैधता द्यावी लागणार आहे.