सोलापूर : श्री सिद्धेश्वर यात्रा समितीच्यावतीने शिवयोगी श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त होम मैदानावर भरविण्यात आलेल्या ५३ व्या राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला. या प्रदर्शनास दररोज ग्रामीण भागातील हजारो शेतकरी व शहरातील नागरिकांनी भेट देऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली.
शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्यातून भरविण्यात आलेल्या यंदाच्या कृषी प्रदर्शनात साडेतीनशेहून अधिक समारोप कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट दालन म्हणून लक्ष्मी हायड्रोलिक्स (एलएनपी), कोठारी उद्योग समूह, के. बी. बायो ऑरगॅनिक या कंपनीच्या प्रतिनिधींना सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष गुरुराज माळगे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त सिद्धेश्वर बघणी, नीलकंठप्पा कोनापुरे, सोमशंकर देशमुख, भीमाशंकर पटणे, चिदानंद बनारोटे, मल्लिनाथ मसरे, डॉ. राजेंद्र घुली, प्रभुराज मैंदर्गीकर, रतन रिक्के, पशुपतीनाथ माशाळ, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव जम्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प उपसंचालक मदन मुकणे, आत्माचे निवृत्त उपसंचालक विजयकुमार बरबडे, प्रा. डॉ. एन. जे. रणशुरू, प्रा. माँ. व्ही.व्ही. इंडी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्टॉलधारकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. प्रदर्शनात मुख्य आकर्षण ठरलेल्या ‘सोन्या’ बैलाचे मालक विद्यानंद औटी यांचाही विशेष गौरव करण्यात आला. याशिवाय मंडप उभारणी केलेले सचिन भिसे, स्मार्ट एक्स्पोचे सोमनाथ शेटे व संगमेश्वर महाविद्यालय, कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालय, वालचंद महाविद्यालय ,निर्मलाताई ठोकळ कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचाही प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कृषी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष माळगे म्हणाले, गेल्या वर्षीपासून गड्डा यात्रेच्या अगोदर डिसेंबरमध्ये कृषी प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यंदा गतवर्षपिक्षा चांगला प्रतिसाद लाभल्याचेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. संतोष भेटकरी यांनी केले.
समारोप कार्यक्रमात बोलताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने म्हणाले, ५३ वर्षांची परंपरा लाभलेले श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन महाराष्ट्रातील एकमेव आहे. गड्डा यात्रे अगोदर हे प्रदर्शन भरविल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ घेता आला, पुढील वर्षी आणखी चांगल्या पद्धतीने कृषी प्रदर्शन भरविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.