पुणे : पुण्यातील नवले पुलाजवळ सोमवारी झालेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा मुद्दा गंभीरपणे समोर आणला आहे. या अपघातात काही नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. याआधीही या ठिकाणी अनेकदा अपघात होऊन जीवितहानी झाली आहे.
खासदार सुळे यांनी या संदर्भात एक सविस्तर पोस्ट करत नवले पूल परिसरातील वारंवार होणा-या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, या ठिकाणी मागील काही वर्षांत अनेक अपघात झाले असून त्यात अनेकांनी प्राण गमावले आहेत. अशा घटना वारंवार होण्यामागे रस्त्यांची रचना, वाहतूक कोंडी, वेगावर नियंत्रण नसणे आणि सुरक्षा उपाययोजनांचा अभाव हे प्रमुख मुद्दे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी रस्ते सुरक्षित बनवणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी मांडले. या पोस्टमध्ये सुळे यांनी न-हे ते रावेत या मार्गावरील एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामाचा मुद्दाही उपस्थित केला. या मार्गासाठी मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. नवले पूल परिसरात वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने एलिव्हेटेड मार्ग केवळ पर्याय नाही तर अत्यावश्यक गरज बनली आहे. या प्रकल्पामुळे अपघातांचे प्रमाण कमी होऊन वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एलिव्हेटेड मार्ग सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरील दबाव कमी होऊन पर्यायी मार्ग उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले.
एक विशेष मोहिम राबवण्याची गरज
खासदार सुळे यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना या संदर्भात नम्र विनंती केली आहे. न-हे ते रावेत दरम्यानच्या एलिव्हेटेड मार्गाचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला द्याव्यात, अशी विनंती त्यांनी पोस्टमध्ये केली. तसेच, रस्ते सुरक्षेसाठी राष्ट्रीय स्तरावर एक विशेष मोहिम राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. अपघात टाळण्यासाठी वेग मर्यादा, वाहतूक चिन्हे, रस्त्यांची दुरुस्ती आणि जागरूकता मोहिमा प्रभावीपणे राबवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

