सेलू : प्रिन्स इंग्लिश सिबीएसई स्कूल सेलू येथे श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून वर्ग नववी -दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयाच्या गेस्ट लेक्चरचे आयोजन करण्यात येते. शाळेतील विद्यार्थ्यांना अतिरिक्त ज्ञान मिळावे या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येतो. दि.५ ऑगस्ट रोजी डॉ. सुधाकर चिताडे (भौतिक शास्त्र विभागप्रमुख निवृत्त ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी) यांच्या गेस्ट लेक्चरचे विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते.
या गेस्ट लेक्चर सिरीजमध्ये डॉ. चिताडे यांनी मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विज्ञान हा विषय थोडा अवघडच. त्यात भौतिकशास्त्र अभ्यासायचे म्हणजे किचकट होऊन जाते. हाच भौतिकशास्त्र विषय अगदी सोप्या भाषेत त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. सोबत स्पर्धा परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाचे महत्त्व सांगितले तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणीचे शंका समाधान केले. या प्रसंगी डॉ.संजय रोडगे यांनी डॉ. चिताडे यांचा सन्मान केला. यावेळी डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, शाळेचे प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर हे उपस्थित होते.