नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गांवर रस्ते अपघात रोखण्यासाठी आता कंत्राटदारांना जबाबदार धरले जाईल. ब्लॅक स्पॉट (जिथे वारंवार अपघात होतात) संपवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) हा निर्णय घेतला. लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, २०२५ पर्यंत देशभरातील महामार्गांवर १३,८०० ब्लॅक स्पॉट्स निश्चित केले आहेत. २०२३ मध्ये महामार्गांवर एकूण ५३,३७२ मृत्यू झाले. २०२४ मध्ये ५२,६०९ आणि २०२५ च्या फक्त सहा महिन्यांत २६,७७० लोक अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. यातील बहुतेक अपघात ब्लॅक स्पॉट्सवर होतात. आतापर्यंत महामार्गांवरील ब्लॅक स्पॉटवर अपघात झाला की त्याची थेट जबाबदारी निश्चित होत नव्हती. रस्त्याच्या डिझाइनमध्ये किंवा अभियांत्रिकीमध्ये त्रुटी असल्यास एनएचएआयला जबाबदार धरले जात असे. देखभाल, खड्डे, पाणी साचणे किंवा सूचनांचा अभाव या समस्या असल्यास कंत्राटदाराला जबाबदार धरले जात असे. आतापर्यंत यासाठी कठोर दंड किंवा परवाना रद्द करण्याची तरतूद नव्हती.
अपघातानंतर जबाबदारी निश्चित करणे अनेकदा अत्यंत कठीण होते. परिणामी कोणीही – एनएचएआय, राज्य सरकार, वाहतूक पोलिस किंवा कंत्राटदार स्वत:हून जबाबदारी घेत नव्हते आणि ब्लॅक स्पॉटची समस्या कायम राहिली.
ही प्रणाली विद्यमान ब्लॅक स्पॉट दूर करण्यासाठी आणि नवीन ब्लॅक स्पॉट तयार होण्यापासून रोखण्यासाठी अमलात आणली जात आहे. जबाबदारी निश्चित करण्यासाठी स्ट्रेच-वाइज सिस्टिम आहे. जबाबदा-या पूर्ण करण्यात निष्काळजीपणा केल्यास मोठ्या दंडाची तरतूद आहे.
तर जबाबदारी एनएचएआय टीमची
मंत्रालयातील अधिका-यांच्या मते असे नाही. डिझाइन किंवा अभियांत्रिकीमध्ये काही समस्या असतील तर त्याची जबाबदारी एनएचएआय टीमची आहे. तथापि, महामार्गावरील ब्लॅक स्पॉट दुरुस्त करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. त्याच्याकडे सुरक्षा सर्वेक्षण करणारे असतात आणि त्यांना त्यांची देखभाल बंधनकारक असते. ते नियमितपणे रस्ता निरीक्षण व त्वरित दुरुस्ती करू शकतात.
ब्लॅक स्पॉट म्हणजे काय?
ब्लॅक स्पॉट म्हणजे रस्त्याचा ५०० मीटरचा भाग, जिथे गेल्या तीन वर्षांत पाचपेक्षा जास्त गंभीर रस्ते अपघात झाले आहेत किंवा १० मृत्यू झाले आहेत. एकाच ब्लॅक स्पॉटवर दोनपेक्षा जास्त वेळा अपघात झाल्यास संबंधितांचा परवाना रद्द होणार. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे यशस्वी मॉडेल… या एक्स्प्रेस वेने ‘४ ई’ मॉडेलसह अपघात झपाटयाने कमी केले.
अभियांत्रिकी
खड्डे भरणे, वळणे व साइनबोर्ड दुरुस्ती, ब्लॅक स्पॉट काढणे, लाइट-डिव्हायडर बसवणे.
अंमलबजावणी
वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करणे. जसे अतिवेगाबद्दल दंड, हेल्मेट-सीट बेल्टचा अनिवार्य वापर, ओव्हरलोडिंग किंवा चुकीच्या लेनसाठी दंड.
सहभाग
रस्ता सुरक्षेसाठी जागरूकता.
आपत्कालीन काळजी
रुग्णवाहिका, हेल्पलाइन, रुग्णालयांशी थेट संपर्क राखणे.

