नांदेड : प्रतिनिधी
विशेष समाज कल्याण अधिकारी कार्यालयातील समता दूत प्रकल्प अधिकारी(डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) यांनी मुलीच्या पुढील शिक्षणासाठी अनुसूचित जातीची जात पडताळणी होऊन वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी तेरा मार्च रोजी फाईल दाखल केली होती. फाईल मंजूर करण्यासाठी ३० हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती ३ जुलै रोजी १५ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष समाज कल्याण अधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रकल्प अधिकारी कंत्राटी(बार्टी), लोकसेविका सुजाता पोहरे यांनी ३ जुलै रोजी तक्रारदार यांच्या मुलीच्या अनुसूचित जातीच्या जात पडताळणीसाठी तक्रारदार यांनी त्यांच्या मुलीचे ऑफलाईन अर्ज सादर केला होता. आरोपी सुजाता पोहरे यांची भेट घेतली असता तक्रारदार यांनी सांगितले की, मी काम करीत असलेल्या विभागाच्या शेजारी जात पडताळणी विभागाचे काम चालते, तेथे माझी ओळख आहे. पैसे भरल्याशिवाय काम होत नाही, तुम्ही २० हजार रुपये टोकन दिल्यास तुमचे काम होईल, अशी तक्रार २६ जून रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. ३ जुलै रोजी समाज कल्याण विभाग परिसरात सुजाता पोहरे यांच्या कक्षात लाच मागणीची पडताळणी केली.
जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्याकरिता एकूण ३० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी १५ हजार रुपये ३ जुलै रोजी लाच स्वीकारताना सापळा रचून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सुजाता पोहरे यांना रंगे हात पकडले. याप्रकरणी सुजाता पोहरे यांच्याविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई पोलिस निरीक्षक करीम खान पठाण यांच्या पथकाने केली. या कारवाईत पोलिस हवालदार मेनका पवार, यशवंत दाभंडवार, ईश्वर जाधव, रमेश नामपल्ली यांच्या पथकाने केली आहे.