मुंबई : प्रतिनिधी
२६१ नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी आज राज्यभरात सरासरी ६० टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मतदानादरम्यान अनेक ठिकाणी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडे झाले. बोगस मतदानाचे आरोप, मतदानयंत्रातील बिघाड यावरूनही अनेक ठिकाणी वातावरण तापले. परंतु या घटना वगळता शांततेत मतदान पार पडले. दरम्यान, २४ नगर परिषद, नगर पंचायतींसाठी २० डिसेंबरपर्यंत मतदान पुढे ढकलल्याने आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उद्याच्या मतमोजणीला स्थगिती देत उर्वरित २४ नगरपालिकांचे मतदान झाल्यानंतरच २१ डिसेंबरला एकत्रित मतमोजणी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आणखी १८ दिवस निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतीची निवडणूक जाहीर केली होती. परंतु उमेदवारांच्या अपिलांचा वेळेत निर्णय न आल्याने २४ ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या तर ३ ठिकाणची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे २६१ नगरपरिषदा व नगरपंचायतीसाठी आज मतदान झाले. बहुतांश ठिकाणी तब्बल १० वर्षानंतर नगरपालिकेची निवडणूक होत असल्याने व सर्वच पक्ष ताकदीने निवडणुकीत उतरल्याने अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीसाठी मतदानही चांगले झाले. राज्यात सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मालवण नगरपरिषदेची निवडणूकही चांगलीच गाजली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी मतदानाच्या आदल्या रात्रीच दीड लाख रूपयांची रोकड पकडली, ती भाजप पदाधिका-याची असल्याचा आरोप केला. याआधीही निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करत रोकड पकडून दिली होती.
कार्यकर्ते भिडले, अनेक ठिकाणी राडा
अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. महाड नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान गोगावले व सुनील तटकरे या महायुतीतील २ नेत्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. यामुळे महाडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मनमाडमध्ये नेहरू भवन मतदान केंद्राजवळ भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. येवल्यातही मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) समर्थकांमध्ये राडा झाला. त्र्यंबकेश्वरमध्ये पोलिस आणि उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींमध्ये बाचाबाची झाली. मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.
मतमोजणी लांबल्याने उमेदवारांचा जीव टांगणीला
२४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींची निवडणूक २० डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणा-या अनेक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्या होत्या. या याचिकांवर नागपूर खंडपीठापुढे सुनावणी झाली. उद्याच्य निकालाचा २४ नगरपरिषदांच्या २० डिसेंबर रोजी होणा-या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सर्वच नगरपालिकांची मतमोजणी एकत्र करावी ही मागणी मान्य करताना आज मतदान होत असलेल्या ठिकाणचे निकालही २१ तारखेलाच जाहीर करावेत, असे आदेश दिले. यामुळे बुधवारची मतमोजणी २१ तारखेपर्यंत पुढे गेली आहे.

