बोरी : जिंतूर तालुक्यातील बोरी येथील गोरक्षक तथा शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अनिल अजयराव गोरे (वय २७) दि. ९ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास परभणीस जात असताना त्यांच्या दुचाकीला परभणीहून जिंतूरकडे जाणा-या कारने धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने गोरे यांचा मृत्यू झाला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि गोरक्षक म्हणून परिचित असलेल्या गोरे यांच्या निधनाची बातमी समजताच बोरी आणि परिसरात शोककळा पसरली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
बोरी येथील रहिवासी अनिल गोरे हे गोरक्षक तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी म्हणून परिचित होते. शुक्रवारी नेहमीप्रमाणे त्यांनी बोरी येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे सायंकाळची आरती केली. आरती आटोपल्यानंतर ते दुचाकीने क्रमांक (एमएच २२ बीएल ९५३९) परभणीस जात होते. याचवेळी स्विफ्ट डिझायर कार (एमएच ०५ बीएल २५७०) परभणीहून जिंतूरच्या दिशेने जात होती. जिंतूर-परभणी महामार्गावरील माक पाटीजवळ सहारा हॉटेलसमोर कार आणि दुचाकीची भीषण धडक झाली. या अपघातात गोरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर गोरे हे गंभीर जखमी अवस्थेत काही काळ रस्त्यावर पडून होते. बोरीचे पोलिस कर्मचारी सय्यद दिशान परभणीच्या दिशेने जात असताना त्यांच्या निदर्शनास हा अपघात आला. त्यांनी रस्त्याने जाणारी रुग्णवाहिका थांबवली आणि इतर नागरिकांच्या मदतीने जखमी गोरे यांना उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले.
मात्र, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिका-यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या अपघात प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवार, दि. १० ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई, बहीण आणि भाऊ असा परिवार आहे.
















